Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर असून, त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत विविध विकास प्रकल्पांबाबत चर्चा झाली. बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली – मुंबईत इंडियन इन्स्टिट्युट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (I.I.C.T.) उभारण्यात येणार आहे. आयआयटीच्या धर्तीवर हे संस्थान असणार असून, त्यासाठी फिल्म सिटीमध्ये जागा देण्यात येणार आहे. केंद्र सरकार या प्रकल्पासाठी 400 कोटी रुपयांचा निधी देणार आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
फडणवीस यांनी काय घोषणा केली?
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आयआयटीप्रमाणेच आता आयआयसीटी उभारण्याचा निर्णय झाला आहे. पहिली आयआयसीटी मुंबईत स्थापन होणार असून, यासाठी गोरगाव फिल्मसिटीमध्ये जागा निश्चित करण्यात आली आहे. केंद्र सरकार या प्रकल्पासाठी 400 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.”
मोदी-फडणवीस भेटीत कोणते मुद्दे चर्चेत आले?
दिल्ली भेटीदरम्यान फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात राज्याच्या विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
- गडचिरोलीला ‘स्टील सिटी’ बनवण्याचा प्रस्ताव
गडचिरोली जिल्ह्यात पोलाद उद्योगाचा मोठा विस्तार सुरू आहे.
गडचिरोलीला ‘मायनिंग हब’ म्हणून विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने सहकार्य करावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली.
- नागपूर विमानतळ प्रकल्पाला गती
नागपूर विमानतळाच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून काही अडचणी दूर करण्याबाबत चर्चा झाली.
लवकरच विमानतळाच्या प्रकल्पाला गती मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
- स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वित्त आयोगाचा निधी
15 व्या वित्त आयोगाचा निधी लवकर मिळावा, अशीही मागणी फडणवीस यांनी पंतप्रधानांकडे केली.
या संदर्भात मोदींनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुंबईत जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल समिट होणार
1 ते 4 मे दरम्यान मुंबईत वर्ल्ड ऑडिओ, व्हिज्युअल अँड एन्टरटेनमेंट समिट आयोजित करण्यात येणार आहे.
या निमित्ताने केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मोठी संधी मिळाली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांचे याबद्दल आभार मानले.
दिल्ली दौरा महाराष्ट्रासाठी फलदायी
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या दिल्ली भेटीत अनेक महत्त्वाचे निर्णय झाले. आयआयसीटीची स्थापना, गडचिरोली पोलाद उद्योगाला चालना, नागपूर विमानतळ प्रकल्पाला गती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निधी या सगळ्या घोषणा महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणार आहेत. यामुळे फडणवीस यांचा हा दिल्ली दौरा यशस्वी ठरल्याची चर्चा रंगली आहे.