Satish Bhosale : खोक्या भोसलेचं पाडलेलं घर पेटवलं; जनावरांचा चाराही पेटला, काही जनावरांचा मृत्यू, जीवनावश्यक वस्तू जळाल्या

Satish Bhosale : बीडमध्ये भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या घराला अज्ञातांनी आग लावल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्री घडलेल्या या घटनेत घरातील महत्वाच्या वस्तू जळून खाक झाल्या असून, जनावरांचा चारा जळाल्यामुळे काही पशूंचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

वनविभागाने केलेली कारवाई आणि त्यानंतर लागलेली आग

सतीश भोसलेच्या ग्लास हाऊसवर वनविभागाने अनधिकृत बांधकामाच्या आरोपाखाली कारवाई केली आणि त्याचे घर बुलडोझरने पाडले. यानंतर रात्रीच्या वेळी अज्ञातांनी त्याच्या घराजवळ आग लावली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.

सतीश भोसले कोण आहे?

सतीश भोसले हा मागील काही वर्षांपासून राजकीयदृष्ट्या सक्रिय असून, तो भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पदाधिकारी आहे. शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी असलेल्या भोसलेवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

खोक्या भोसलेचा वादग्रस्त इतिहास

बीडमध्ये काही दिवसांपूर्वी मारहाणीचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सतीश भोसले चर्चेत आला. त्यानंतर अमानुष मारहाणीचे आणखी काही व्हिडीओ समोर आले. एवढेच नव्हे, तर वन्य प्राण्यांची शिकार, तस्करी, तसेच वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करून घर बांधल्याचे आरोपही त्याच्यावर आहेत. शिकारीचे सामानही त्याच्या घरात सापडल्याने त्याच्या गुन्हेगारी कारवायांबाबत संशय अधिक बळावला.

आगीमागे कोण? पोलिस तपास सुरू

सतीश भोसलेला बीड पोलिसांनी प्रयागराजमधून अटक केली असून, त्याचा फोन जप्त करण्यात आला आहे. तो फरार असताना कोणाच्या संपर्कात होता आणि त्याला कोणाची मदत मिळाली? याचा तपास सुरू आहे. आरोपीला शिरूर पोलिस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आले असून, वैद्यकीय तपासणीनंतर अटक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

घर जाळण्यामागे कोणाचा हात?

सतीश भोसलेच्या घरावर आधीच वनविभागाने कारवाई करून ते पाडले होते, त्यानंतर अज्ञातांनी ते घर पेटवले. ही आग नेमकी कोणी लावली आणि त्यामागे कोणते कारण आहे? याचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेने बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

वन्यप्राण्यांची शिकार आणि तस्करी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

वन्यप्राण्यांची बेकायदेशीर शिकार आणि तस्करी हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे यासंदर्भात कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. सतीश भोसले प्रकरणात आणखी कोण कोण सामील आहे? याचा तपास आता अधिक वेगाने सुरू करण्यात आला आहे.