Lilavati Hospital : मुंबईतील प्रसिद्ध लीलावती हाॅस्पीटलमध्ये काळी जादू, मानवी हाडे, केसांनी भरलेली ८ मडकी, नेमकं घडलं काय?

Lilavati Hospital : मुंबईतील सुप्रसिद्ध लीलावती रुग्णालय एका धक्कादायक प्रकरणामुळे चर्चेत आले आहे. रुग्णालयाच्या विद्यमान विश्वस्तांनी माजी विश्वस्तांवर मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करत, तब्बल ₹1,250 कोटींहून अधिक रकमेच्या अनियमिततेबाबत तक्रार दाखल केली आहे. याशिवाय, रुग्णालयात काळ्या जादूच्या शक्यतेनेही खळबळ उडाली आहे.

रुग्णालयाच्या केबिनखाली मानवी हाडं, कवट्या आणि तांदूळ?

रुग्णालयाच्या एका केबिनमध्ये फरशीखाली मानवी हाडं, कवट्या, केस, तांदूळ आणि आठ मडकी सापडल्याचा दावा विद्यमान विश्वस्तांनी केला आहे. यासंबंधी व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आल्याची माहिती एका माजी कर्मचाऱ्याने दिली आहे.

माजी विश्वस्तांवर गंभीर आरोप; त्यांनी फेटाळले दावे

लीलावती रुग्णालयाचे संस्थापक किशोर मेहता यांच्या भावाविरुद्ध आणि त्यांच्या नातेवाईकांवर तीन वेगवेगळे एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर बनावट कागदपत्रांच्या आधारे विश्वस्त पद बळकावल्याचा, तसेच मोठ्या प्रमाणात करचुकवेगिरीचा आरोप आहे. तथापि, माजी विश्वस्त विजय मेहता आणि त्यांच्या मुलाने हे सर्व आरोप निराधार आणि बनावट असल्याचे सांगत फेटाळले आहे.

काळी जादू करून हल्ल्याचा कट?

रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनी तक्रार दाखल करत, माजी विश्वस्तांनी प्रशांत मेहता आणि त्यांच्या आईला इजा पोहोचवण्यासाठी काळी जादू केल्याचा दावा केला आहे. मात्र, विजय मेहतांच्या कुटुंबीयांनी हे आरोप नाट्यपूर्ण आणि खोटे असल्याचे म्हटले आहे.

लीलावती रुग्णालयाचा इतिहास आणि वादग्रस्त प्रकरणे

२००२ मध्ये किशोर मेहता परदेशात असताना त्यांच्या भावाने तात्पुरता कारभार सांभाळला, मात्र नंतर कथित बनावट सहीच्या आधारे आपला मुलगा आणि पुतण्याला विश्वस्त म्हणून नेमल्याचा आरोप आहे. या प्रकरणावरून २०१६ मध्ये न्यायालयीन लढाई झाली आणि किशोर मेहता यांनी पुन्हा विश्वस्तपद मिळवले. २०२४ मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा प्रशांत मेहता विश्वस्तपदी आला, आणि त्यानंतरच या गैरव्यवहारांचा पर्दाफाश झाला.

मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित रुग्णालयांपैकी एक असलेल्या लीलावती रुग्णालयात हा प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी, उद्योगपती आणि खेळाडू याठिकाणी उपचार घेत असल्याने, या वादाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.