Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या आणि निलंबित पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणातील न्यायाधीशांसोबत होळी साजरी केल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.
दमानिया यांनी दोन निलंबित पोलीस अधिकारी आणि न्यायाधीशांचा रंगपंचमी खेळतानाचा फोटो ट्विट करत हा मुद्दा उपस्थित केला. त्या म्हणाल्या, “देशमुख हत्या प्रकरणामुळे निलंबित पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि सक्तीच्या रजेवर असलेले पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन हे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्यासोबत रंगांची उधळण करताना दिसले. न्यायाधीश स्वतःच संशयित आरोपींसोबत सण साजरा करत असतील, तर न्यायव्यवस्थेच्या विश्वासार्हतेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते.”
त्या पुढे म्हणाल्या की, “या प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्याकडून काढून घ्यावी आणि दुसऱ्या न्यायाधीशांची नियुक्ती करावी,” अशी मागणी त्या न्याय व्यवस्थेकडे करणार आहेत.
निलंबित अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
या आरोपांवर पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी प्रतिक्रिया देत आपली बाजू मांडली आहे. व्हॉट्सअॅपवर काही पत्रकारांना पाठवलेल्या संदेशात त्यांनी लिहिले की, “आम्ही केवळ शेजाऱ्यांसोबत वैयक्तिक सण साजरा करत होतो. आम्ही कोणतेही गैरकृत्य केलेले नाही. आम्हाला आरोपींसारखे वागवले जाऊ नये.”
दरम्यान, अंजली दमानिया यांनी न्यायव्यवस्थेवर गंभीर आरोप करत हा मुद्दा अधिक चर्चेत आणला आहे. प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.