Nagpur : औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू झालेल्या वादाने काल नागपुरात हिंसक वळण घेतले. शहरातील चिटणीस पार्क, महाल आणि गणेशपेठ परिसरात दोन गटांमध्ये दगडफेक झाली, त्यामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली. नागपुरात काही काळ दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनांनी अनेक कुटुंबांना हादरवून टाकले, त्यात दहिकर कुटुंबही होते.
रस्त्यात जमाव, धमक्या आणि भीतीचा माहोल
कॉलेजहून घरी परतणाऱ्या आस्था दहिकरने या घटनेचे वर्णन करताना तिच्या भीतीदायक अनुभवाबद्दल सांगितले. “नेहमीप्रमाणे मी घरी निघाले असताना समोर मोठा जमाव दिसला. रिक्षावाल्यांना धमक्या दिल्या जात होत्या—’तुम्ही जर इथे गेलात, तर जिवंत परत याल याची आम्ही हमी देऊ शकत नाही!’ सगळी वाहतूक थांबवण्यात आली होती, कुणालाही पुढे जाऊ दिलं जात नव्हतं. कसेतरी रिक्षावाल्याने आम्हाला बाहेर काढले, पण चिटणीस पार्कजवळ ८००-९०० लोकांचा जमाव होता. मी पायीच घराकडे निघाले, तेव्हा गल्लीभर घोषणा आणि शिवीगाळ सुरू होती,” असे आस्थाने सांगितले.
आईची चिंता आणि कुटुंबाची असहाय्यता
आस्थाची आई स्वाती दहिकर यांनी हा प्रसंग सांगताना अश्रू अनावर झाले. “मी सतत तिला फोन करून तिची चौकशी करत होते. माझे पती घरी नव्हते, आणि माझे वडील नुकतेच हार्ट स्ट्रोकमधून सावरत होते. कालची घटना त्यांच्या कानावर गेली असती, तर त्यांचा रक्तदाब वाढला असता. त्यामुळे त्यांच्यापासून सगळं लपवावं लागलं. त्यांच्या खोलीत जाताना मी चेहऱ्यावर हसू ठेवलं, पण मनात भीती होती,” असे त्यांनी सांगितले.
पूर्वनियोजित कट?
या हल्ल्याची पूर्वतयारी झाल्याचा संशय आस्थाने व्यक्त केला. “त्या जमावाकडे मोठमोठे सिमेंटचे गोटे होते, जे गाड्यांवर फेकले जात होते. आमच्या भागात कुठेही बांधकाम सुरू नाही, मग हे गोटे, बांबू आले कुठून? हा सगळा हिंसाचार आधीच ठरवून केलेला होता का?” असा सवाल तिने उपस्थित केला.
नागपुरातील तणावपूर्ण वातावरण
काल झालेल्या या घटनेमुळे नागपुरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरी नागरिक अजूनही धास्तावलेले आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, हिंसाचारात सहभागी असलेल्या लोकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.