Disha Salian : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात आता नवा वळण घेत आहे. दिशाच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. दिशाची सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.
याचिकेत मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि मुंबई पोलिसांवर दिशाभूल करून दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. तसेच, या याचिकेत आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि दिनो मोरियावरही आरोप करण्यात आले आहेत. दिशाच्या वडिलांनी याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
मंत्री नितेश राणे आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी दिशाच्या मृत्यूबाबत केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचा दावा याचिकेत केला आहे. या आरोपांनंतर, नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले की, “आदित्य ठाकरेंनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. जर ते आरोप चुकीचे असतील, तर चौकशीला सामोरं जाऊन दूध का दूध आणि पानी का पानी करावं.”
नितेश राणे यांनी गंभीर आरोप करत म्हटले की, “दिशा ही एक साधी मुलगी होती, जी मुंबईत स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आली होती. या लोकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केली.” ते आदित्य ठाकरेंना सत्य सांगण्याची आणि हिंमत दाखवून राजीनामा देण्याची मागणी करत आहेत.
त्याचवेळी, जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदेंवर ताशेरे ओढले असून, फडणवीसांशी संबंधित प्रश्न उपस्थित केले. नितेश राणे यांनीही या प्रकरणाची गंभीरता दर्शवली असून, “या प्रकरणात आणखी अनेक गोष्टी बाहेर येणार आहेत, आणि सत्य उघड होईल,” असा इशारा दिला आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, “उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी जे काही केले ते लोकांना समजेल. सीसीटीव्ही फुटेज, मस्टर रॉल्स, आणि इतर पुरावे गायब केले गेले. हे सर्व सत्य लवकरच समोर येईल,” असं राणे म्हणाले.