अजित पवार यांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवारांनी सत्तेत जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांकडे जास्त संख्याबळ असून त्यांना मिळणारा पाठिंबाही वाढताना दिसून येत आहे.
अशात अजित पवार यांनी शरद पवारांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. शरद पवारांच्या बैठकीला उपस्थित असलेल्या दोन आमदारांनी गुरुवारी अजित पवार यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. त्यामध्ये आमदार राजेश टोपे आणि सुनिल भुसारा यांच्या नावाचा समावेश आहे.
राजेश टोपे आणि सुनिल भुसारा यांनी अजित पवारांचे शासकीय निवासस्थान देवगिरी बंगल्यावर भेट घेतली आहे. रात्री ९ ते १० च्या दरम्यान दोन्ही आमदारांनी भेट घेतली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता ते अजित पवार गटात जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शरद पवार यांनी बुधवारी एक बैठक बोलावली होती. त्यामध्ये अनेक आमदार उपस्थित होते. या बैठकीत आमदार राजेश टोपे आणि सुनिल भुसारा हेदेखील उपस्थित होते. त्यामुळे ते शरद पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट झाले होते. पण त्यानंतर आता त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे.
राष्ट्रवादीतील आमदारांचा मोठ्या प्रमाणात अजित पवारांना पांठिंबा आहे. सध्या अजित पवारांकडे ३३ आमदार असल्याचे म्हटले जात आहे. तर शरद पवारांकडे १८ आमदार आहे. पण अजित पवारांनी आपल्याकडे ४० आमदार असल्याचे म्हटले आहे.
तसेच हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनीही अजित पवारांची भेट घेतली आहे. चेतन तुपेंनी प्रतिज्ञापत्रावर सही करण्यासाठीच अजित पवारांची भेट घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे ते सुद्धा अजित पवार यांच्या गटात जाणार अशी चर्चा रंगली आहे. चेतन तुपे देखील शरद पवारांच्या बैठकीला उपस्थित होते. पण त्यानंतर त्यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे.