एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाच्या वर्षभरानंतर अजित पवारांनी बंड केले. त्यामुळे राज्यातील दोन महत्वाचे पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत मोठी फुट पडल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवारांच्या बंडानंतर अनेक आमदार त्यांच्यासोबत गेले आहे.
सत्तेत असल्यामुळे दिवसेंदिवस त्यांना मिळणारे पाठबळ वाढत आहे. या दोन्ही फुटींमागे भाजपचा हात असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहे. राज्यात सध्या फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे, असे आरोप विरोधी पक्षातील नेत्यांकडून केले जात आहे.
असे असताना आता भाजपलाच धक्का बसला आहे. भाजपचे नेतेच शरद पवार यांच्या गटात येताना दिसून येत आहे. कोल्हापूरातील भाजपच्या एका बड्या नेत्याने शरद पवारांच्या गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे राजकारणात उलटी गंगा वाहू लागली की काय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
व्ही बी पाटील यांनी कोल्हापूरातून लोकसभा निवडणूक लढायचं जाहीर केलं होतं. त्यानंतर भाजप नेते सुरेश घागडे यांनी शरद पवार यांच्या गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.
विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकांसाठी शरद पवारांच्या गटाकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झाल्याचे म्हटले जात आहे. अशातच सुरेश घाडगे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे त्यांचा गट आणखी मजबूत झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यामुळे अनेक नेते, आमदार अजित पवारांच्या गटात गेले आहे. त्यामुळे शरद पवार सध्या पर्यायी नेते शोधताना दिसत आहे. चंदगड विधानसभेसाठीही शरद पवार आश्वासक चेहरा शोधत होते. अशातच सुरेश घाडगे यांनी शरद पवारांच्या गटात प्रवेश केला आहे.
दरम्यान, सुरेश घाडगे यांनीही या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे. सत्ता असताना मज्जा घ्यायची आणि नंतर साथ सोडायची, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. मला विकासकामे करायची आहे. ती मला शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली करायची आहे, असे सुरेश घाडगे यांनी म्हटले आहे.