राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले आहे. एक गट अजित पवारांचा आहे तर दुसरा गट हा शरद पवारांचा आहे. अजित पवारांसह अनेक आमदार हे सत्तेत गेले आहे, तर शरद पवारांसोबतचे आमदार हे विरोधात आहे.
आता या फुटीला एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. पण सत्तेत जाण्याआधी अजित पवारांनी मोठी खेळी केली होती. त्यांनी निवडणूक आयोगाकडे एक याचिका दाखल केली होती. त्यामध्ये त्यांनी आपणच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असल्याचे म्हटले होते.
अजित पवारांच्या याचिकेनंतर निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या गटाला एक नोटीस पाठवली होती. त्यामध्ये त्यांना या फुटीवर त्यांचं मत मांडण्यास सांगितलं होतं. आता या नोटीसला शरद पवारांच्या गटाकडून उत्तर देण्यात आले आहे.
शरद पवारांनी असे काही उत्तर दिले आहे की त्यामुळे अजित पवारांची चिंता वाढली आहे. अजित पवारांच्या गटाला घेरण्याचा प्रयत्न करण्यासाठी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फुट पडलेली नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आगामी काळात मोठ्या घडामोडी घडण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फुट पडलेली नाही. अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हाबाबत केलेली मागणी तथ्यहीन आहे. निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या गटाची मागणी फेटाळली पाहिजे, असे उत्तर शरद पवारांनी दिले आहे.
तसेच अजित पवारांच्या याचिकेमुळे राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आहेत, हे सिद्ध होत नाही. राष्ट्रवादी हा पक्ष निवडणूक आयोगात नोंदणीकृत पक्ष आहे. या पक्षाचे अध्यक्ष हे शरद पवारच आहे. तसेच अध्यक्षपदाचं पत्र प्रफुल्ल पटेल यांनीच दिलं होतं, असे शरद पवारांनी नोटीसला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. आता या उत्तरामुळे अजित पवार अडचणीत आले आहे.