शिंदेंना सर्वात मोठा धक्का! पक्षातील ४० वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे; धक्कादायक कारण आले समोर

शिवसेना फुटीला आता १ वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. असे असतानाही शिवसेनेच्या दोन्ही गटांंमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिंदे गटात मोठी इनकमिंग सुरु होती, पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी सामूहिक राजीनामे दिले आहे. त्यामुळे शिंदे गटात एकच खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या कांदिवली, चारकोप, मालाडमधील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे.

सर्व पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून आपण राजीनामा देत आहोत, असे सांगितले आहे. शिवसेनेचे जेष्ठ नेते रामदास कदम यांचे चिरंजीव सिद्धेश कदम यांच्यावर आपली नाराजी असल्याचे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदेंकडे त्यांनी याबाबत तक्रारही केली आहे.

आम्ही तुमच्यासोबत आहोत, पण सिद्धेश कदमांना समज द्या. सिद्धेश कदमांकडून आम्हाला काम करु दिले जात नाहीये, असे पदाधिकाऱ्यांनी या पत्रामध्ये म्हटले आहे. ३० ते ४० पदाधिकाऱ्यांनी एकाचवेळी राजीनामे दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्राचे शिवसेना विभागप्रमुख विकास गुप्ता यांनी याबाबत प्रतिक्रिया देत नक्की काय झालं आहे हे सांगितलं आहे. आमच्या विधानसभा मतदार संघामध्ये सिद्धेश कदम यांची एंट्री झाली आहे. ते आमच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मानसिक छळ करताय. या छळाला कंटाळून आम्ही राजीनामा देतोय, असे विकास गुप्ता यांनी म्हटले आहे.

तसेच मालाडचे संघटक नागेश आपटे म्हणाले की, मी मालाडमध्ये पक्षासाठी सुरुवातीपासून काम करत आहे. पण आता मालाडमध्ये पदाधिकाऱ्यांना काढलं जात आहे. त्यांना त्रास दिला जातोय. त्यामुळे आम्ही राजीनामे देतोय.

आम्ही अंतर्गत गटबाजीला कंटाळलोय. त्यामुळे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. सिद्धेश कदम हे आमच्या कामात हस्तक्षेप करत आहे. ते गटबाजी करत आहे. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे, असे चारकोप विधानसभेचे प्रमुख संजय सावंत यांनी म्हटले आहे.