सत्तेचा माज! शिंदेगटातील आमदारपुत्राची ऑफिसमध्ये घुसून मारहाण, बंदूकीचा धाक दाखवून केले अपहरण

शिंदे गटाचे आमदार नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतात. आता शिंदे गटातील एका आमदाराच्या मुलावर अपहरणाचा आरोप करण्यात आला आहे. शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलावर गंभीर आरोप करण्यात आले आहे.

प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांच्यावर अपहरण करण्याचा आरोप झाला आहे. त्यांच्यावर आता शस्त्रास्त्र आणि अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज सुर्वे आणि त्यांच्या साथीदारांनी एका व्यवसायिकाचे अपहरण केले होते.

व्यवसायिकाच्या ऑफिसमध्ये घुसून त्यांनी मारहाण केली होती. त्यानंतर त्याचे अपहरण करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मनोज मिश्रा असे त्या व्यवसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी राज सुर्वे यांच्यासह १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

५ वर्षांचा करार रद्द करण्यासाठी हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे. राज सुर्वे आणि त्यांच्या साथीदारांनी ग्लोबल म्युझिक जंक्शनच्या कार्यालयात जाऊन मनोज मिश्रा यांना मारहाण केली होती. त्यानंतर त्यांना कारमध्ये बसवून दहिसर पूर्वमधील एका कार्यालयात त्यांना नेण्यात आले होते.

कार्यालयात नेण्यात आल्यानंतर मनोज मिश्रांकडून १०० रुपयांच्या एका स्टँप पेपरवर करार लिहून घेण्यात आला. त्यानंतर त्या करारावर त्यांची सही घेण्यात आली. यावेळी त्यांना शिवीगाळही करण्यात आली होती.

दरम्यान, ऑफिसमध्ये मारहाण झाल्यामुळे पोलिसांना याबाबत माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी तातडीने त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. अखेर पोलिस त्या कार्यालयात पोहचले आणि मनोज मिश्रा यांची सुटका केली. या घटनेत आमदाराचा मुलगा सामील असल्यामुळे संपुर्ण राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.