ऑनर किलिंगच्या घटनेने राज्यात खळबळ! वडीलांनीच मुलीचा खून केला अन् शेतात नेऊन मृतदेह…

नांदेड जिल्ह्यामध्ये एका बापाने आपल्याच मुलीची हत्या केल्याचे समोर आले आहे. संबंधित घटना ही मुखेड तालुक्यात घडली आहे. मुलीला इच्छेविरुद्ध लग्न करायचे होते. त्यामुळे वडिलांनी असे टोकाचे पाऊल उचलले आहे.

मुखेड तालुक्यातील मनु तांडा या गावात आठ दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे. वडिलांनी हत्या करुन मुलीला शेतात नेले त्यानंतर तिथे तिचा अंत्यविधी करत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांना संशय आल्यामुळे हे सर्व उघडकीस आले.

आईची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्या वडिलांना ताब्यात घेतले आहे. मुलगी आजारी होती. त्यामुळे आजाराला कंटाळून तिने जीवन संपवले. त्यामुळे आम्ही तिचा अंत्यविधी केला, असा बनाव त्या आरोपीने केला होता.

मुलीचे वय १६ वर्षे होते. राजूरा तांडा येथील एका नातेवाईकाच्या मुलावर तिचे प्रेम होते. ते दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते. ही गोष्ट मुलीच्या वडिलांना कळल्यानंतर त्यांनी याला विरोध केला. पण त्या मुलीने मला त्याच्याशीच लग्न करायचे असा हट्ट धरला होता.

अशात संतापलेल्या वडिलांनी २ ऑगस्टला मुलीची हत्या केली. घटनेनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी मृतदेह शेतात नेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. तसेच या घटनेबद्दल कोणाला सांगितले तर तुझाही जीव घेईन अशी धमकी त्या वडिलांनी मुलीच्या आईला दिली होती.

मुलीच्या अचानक मृत्यूमुळे पोलिसांना संशय आला होता. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला होता. त्यानंतर पोलिसांनी अनेक जबाब नोंदवले होते. तसेच ज्याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. तिथे जाऊन पोलिसांनी तपास केला. त्यानंतर मुलीच्या आईला बोलावून तिची चौकशी करण्यात आली. त्यावेळी हा सर्वप्रकार उघडकीस आला आहे.