‘या’ पुन्हा तारखेला होणार महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाचा विस्तार; अजित पवार गटाला मात्र दणका

गेल्या काही महिन्यांपासून शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडण्यात आला होता. पण आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख ठरवण्यात आली आहे. ९ किंवा १० जुलैला हा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

लवकरच पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. ते सुरु होण्याअगोदरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. पावसाळी अधिवेशनाच्या आधी मंत्र्यांना त्यांच्या खात्याबद्दल माहिती मिळावी, त्यामुळे हा विस्तार केला जात आहे.

मंत्रिमंडळाच्या हालचालीही सुरु झाल्या असून ९ किंवा १० जुलैला हा मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडणार आहे. गुरुवारीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत बैठक पार पडली आहे.

रविवारी राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी आणि त्यांच्या आमदारांनी भाजप-शिवसेनेसोबत हातमिळवत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्यांच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे आता होणाऱ्या मत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादीला आणखी मंत्रिपदं दिली जाणार नाही.

मिळालेल्या माहितीनुसार मंंत्रिमंडळात राष्ट्रवादीकडे ९ मंत्रिपदंच असणार आहे. त्यानंतर आता उरलेली मंत्रिपदं भाजप आणि शिवसेनेत विभागली जाणार आहे. त्यामुळे आता कोणाला किती मंत्रिपदं मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

गेल्या कित्येक महिन्यांपासून एकनाथ शिंदेंचे आमदार मंत्रिमंडळाच्या विस्ताराची वाट पाहत होते. काही आमदारांनी तर आपल्या मंत्रिपद हवे अशी इच्छा जाहीरपणे व्यक्तही केली आहे. पण आता राष्ट्रवादीच्या आमदारांनीही शपथ घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आणि भाजपच्या कोणकोणत्या आमदारांना मंत्रिपद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.