“‘या’ नेत्याच्या त्रासामुळे जीव द्यावा वाटतोय”; शिंदेगटाचे ५०० पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत

काही दिवसांपूर्वी शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी सामूहिकपणे राजीनामा दिला होता. त्यामुळे शिंदे गटात एकच खळबळ उडाली होती. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या मुलाच्या त्रासाला कंटाळून त्यांनी राजीनामा दिला होता.

कांदिवली, मालाड आणि चारकोप या विधानसभा मतदार संघातील ते पदाधिकारी होते. ४० पदाधिकाऱ्यांनी एकसोबत राजीनामा दिला होता. हे सगळं ताजं असतानाच आता शिंदे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

जोगेश्वरीतील शिंदे गटातील अंतर्गत वाद समोर आला आहे. विभागप्रमुखाच्या छळाला कंटाळून एकाचवेळी ५०० ते ६०० पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. विभागप्रमुखांच्या त्रासामुळे आम्हाला जीव द्यावासा वाटतोय, असे पदाधिकारी म्हणताना दिसत आहे.

शिंदे गटाचे जोगेश्वरी पूर्व येथील विभाग क्रमांक चारचे प्रमुख विजय धिवार आणि महिला विभागप्रमुख शिल्पा वेले हे आपल्याला त्रास देत असल्याचे पदाधिकारी म्हणताना दिसत आहे. तसेच त्यांच्या त्रासामुळे आम्हाला जीव द्यावासा वाटतोय, असेही काही पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

अशात या वादावर शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी वेगळीच भूमिका मांडली आहे. गेल्या वर्षभरापासून आम्ही पदाधिकाऱ्यांची कार्यपद्धती पाहत आहोत. ते अकार्यक्षम असल्यामुळे त्यांना बदलण्यात आले आहे, असे गजानन किर्तीकर यांनी म्हटले आहे.

विभागप्रमुख विजय धिवार आम्हाला त्रास देत आहेत. त्यांची मनमानी आम्ही सहन करणार नाही. आमच्या तक्रारी आम्ही वरिष्ठ नेते संजय मोरे, सिद्धेश कदम, नरेश म्हस्के यांच्या कानावर घातल्या होत्या. पण आता आमच्या जागी नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, असे शाखाप्रमुख प्रकाश शिंदे यांनी म्हटले आहे.

आम्ही धिवार यांचा मनमानी कारभार चालु देणार नाही. ते पक्ष संपवायला निघाले आहे. त्यांच्यामुळे माझ्या शाखेतून २०० पदाधिकारी तर जोगेश्वर विधानसभा मतदार संघातून ४०० पदाधिकारी राजीनामा देणार आहे, असेही प्रकाश शिंदेंनी सांगितले आहे.

तसेच धिवार हे महिलांना त्रास देताय. आम्हाला दडपण आल्यामुळे आम्हाला जीवन नकोसे वाटायला लागले आहे. विभागप्रमुख महिलांसमोर इतके घाणेरडे शब्द वापरताय की ते सांगूही शकत नाही. त्यांना कंटाळून आम्ही राजीनामा देतोय, असे विधानसभा संघटक सुरेखा सुर्वे यांनी सांगितले आहे.