राज्याच्या राजकारणात सध्या अनेक धक्कादायक घडामोडी घडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या राज्यात दोन गट पडले आहे. एक गट अजित पवारांचा आहे, तर दुसरा गट शरद पवारांचा आहे. अजित पवार सत्तेत गेल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. पण अजूनही काही राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शरद पवार यांच्या गटात असणारे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. शिवसेनेचे मोठे नेते आणि शिंदे गटातील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शरद पवारांच्या संपर्कात असल्याचे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
अमोल कोल्हे यांच्या या वक्तव्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसेच आढळराव दार ठोठावत असले तरी त्या दाराच्या किल्ल्या माझ्याकडे आहे, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता अमोल कोल्हे यांनी हा दावा केला आहे. अमोल कोल्हे यांनी एक व्हिडिओ शेअर करत हा दावा केला आहे. तसेच त्यांनी यावेळी आढळराव पाटील यांच्यावर टीका देखील केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला चारवेळा मतदार संघातून लढण्याची संधी दिली. पण संकटाच्या काळात तुम्ही त्यांना सोडून गेलात. शरद पवार साहेबांनी मला एकदाच तिकीट दिलं, पण तरीही त्यांच्या संकट काळात मी सोबत आहे. हा आपल्या दोघांमधला फरक आहे, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
आढळराव पाटील हे बोलतात एक आणि वागतात एक. सध्याच्या परिस्थितीत आढळराव पाटील मीडियापासून अडून अडून शरद पवार यांची भेट घेण्यासाठी दारं ठोठावत आहेत. पण त्या दारांच्या किल्ल्या माझ्याकडे आहे, असेही अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.