अजित पवार यांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवारांनी सत्तेत जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांकडे जास्त संख्याबळ असून त्यांना मिळणारा पाठिंबाही वाढताना दिसून येत आहे.
जिल्हा राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आणि सिंदखेड राजाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शरद पवार गटाला आणखी एक धक्का बसला आहे. शिंगणे यांनी शरद पवारांना सोडताना हैराण करणारे कारण सांगितले आहे.
फक्त आणि फक्त बिकट परिस्थितीत असलेली जिल्हा सहकारी बँक वाचवण्यासाठी आपण अजित पवारांसोबत चाललो आहे, असे राजेंद्र शिंगणे यांनी म्हटले आहे. शरद पवारांबद्दल आपल्याला आदर आहे, पण शेतकऱ्यांची बँक वाचवण्यासाठी मी हा निर्णय घेतल्याचे राजेंद्र शिंगणे यांनी म्हटले आहे.
मी शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यांच्याशी चर्चा सुद्धा केली. अजित पवारांनी मला जिल्हा बँकेला मदत करण्याचे ठोस आश्वासन दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी, सोसायट्या वाचवण्यासाठी बँकेला ३०० कोटींचे सोफ्ट लोन मिळणार आहे, असे राजेंद्र शिंगणे यांनी म्हटले आहे.
तसेच ३०० कोटींचे सोफ्ट लोन मिळाले तर बँक वाचू शकते. पण जर ते मिळाले नाही तर बँक वाचणे अशक्य आहे. अजित पवारांनी मला शब्द दिला आहे. ते शब्द पाळणारे नेते आहे. त्यामुळे मी अजित पवारांसोबत जात आहे, असे राजेंद्र शिंगणे यांनी म्हटले आहे.
रविवारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ अजित पवार यांनी घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर ५ जूलैला शरद पवारांनी आमदारांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला राजेंद्र शिंगणे उपस्थित होते. पण आता अजित पवारांनी मागणी मान्य केल्यामुळे शिंगणे यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.