मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटातील आमदार नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. १४ महिने झालेले असतानाही मंत्रिपद न मिळाल्यामुळे काही आमदार नाराज असलेल्याचीही चर्चा होत असते.
आमदार भरत गोगावले हे सुद्धा गेल्या काही महिन्यांपासून मंत्रिपदामुळे चर्चेत आहे. पहिल्या मंत्रिमंडळात त्यांना मंत्रिपद मिळेल अशी चर्चा होती. पण त्यांना अजूनही मंत्रिपद मिळालेले नाही. अशातच त्यांनी हुकलेल्या मंत्रिपदाचा किस्सा सांगितला आहे.
मंत्रिपदासाठी माझाच पहिला नंबर होता. पण एकनाथ शिंदे अडचणीत आल्यामुळे मी माघार घेतली, असे भरत गोगावले यांनी म्हटले आहे. अलिबागच्या एका कार्यक्रमाला ते आले होते. त्यावेळी त्यांनी पदड्यामागच्या घडामोडींबद्दल खुलासा केला आहे.
भरत गोगावले म्हणाले की, शिवसेनेचे पहिल्यांदा जेव्हा ९ मंत्री झाले तेव्हाच मला मंत्रिपद मिळणार होतं. त्यावेळी आमच्या एका सहकाऱ्याने शिंदेंना सांगितले की मला मंंत्रिपद मिळाले नाही, तर माझी बायको जीव देईन. तर एकजण म्हणाला मला मंत्रिपद मिळाले नाही, तर नारायण राणे मला जगू देणार नाही. माझं राजकारण संपवतील.
तसेच पुढे ते म्हणाले की, एका सहकाऱ्याने तर मंत्रिपद मिळाले नाही तर शपथविधीनंतर मी लगेच राजीनामा देईन, असे म्हटले होते. सहकारी आमदारांच्या अशा गोष्टींमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत आले होते. त्यामुळे मला मंत्रिपदासाठी थांबावे लागले.
तसेच पुढे भरत गोगावले म्हणाले की, मी तर एकाला फोनच केला होता. त्याला म्हणालो होतो की, अरे तुमच्या संभाजीनगरमध्ये पाचपैकी दोघांचा मंत्रिपदं मिळाली आहे. तुला काय घाई आहे. त्यामुळे तोही थांबला. त्यावेळी आम्ही जे थांबलो ते अजूनपर्यंत थांबलोच आहे. आधी सर्वांनी आमचे कौतूक केले पण आता मलाच ते बोलत आहे.
दरम्यान, भरत गोगावले हे एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे शिंदेंनी भाजपसोबत सरकार स्थापन केले त्यावेळी त्यांना पहिले मंत्रिपद मिळेल असे म्हटले जात होते. पण १४ महिने झाले तरीही त्यांना अजून मंत्रिपद मिळालेले नाही.