बिहार मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मृत मुलीवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर काही दिवसांनी त्याच मुलीचा तिच्या वडिलांना व्हिडिओ कॉल आला आहे.
हे पाहून त्याच्या कुटुंबीयांसह पोलीस आणि गावकऱ्यांचाही गोंधळ उडाला आहे. जेव्हा तिने व्हिडिओ कॉल करून मी जिवंत असल्याचे सांगितले तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. जाणून घेऊयात नेमकं काय घडलं.
पूर्णियातील अकबरपूरच्या दधवा गावात सापडलेला मृतदेह पोलिसांसाठी डोकेदुखी ठरला आहे. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेहावर अंत्यसंस्कारांची तयारी केली होती, मात्र मुलीने स्वत: फोन करून मी जिवंत असल्याचे सांगितले.
विशेष म्हणजे 15 ऑगस्ट रोजी या तरूणीचा मृतदेह कालव्यात सापडला होता. जेथे मृतदेह बलियाच्या तुलसी बिशनपूर येथील रहिवासी तरूणीचा असल्याची ओळख पटली होती.
नातेवाईकांनी कपडे आणि बोटाच्या आधारे मृतदेहाची ओळख पटवली. कारण तरूणीने घरातून पळून जाऊन प्रियकराशी लग्न केले होते, मात्र आता पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. कारण कालव्यात कोणाचा मृतदेह सापडला, हे कोडेच बनले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनोळखी मृतदेहाचे नाव अंशू कुमारी, विनोद मंडल यांची मुलगी, रहिवासी तुलसी बिशनपूर, बलिया ओपी परिसरात आहे. परंतु ती अद्याप जिवंत असून तिच्या पतीसोबत तिच्या सासरच्या घरी राहत आहे.
एवढेच नाही तर अंशूने आपल्या कुटुंबीयांना व्हिडिओ कॉल करून सांगितले की, ती जिवंत आहे आणि तिचे लग्न झाले आहे. अंशू सध्या चंदीगडमध्ये आहे.
त्यांच्या मुलीचा व्हिडीओ कॉल येताच त्यांची मुलगी जिवंत असल्यानं कुटुंबीयांमध्ये आनंदाची लाट उसळली होती, मात्र आता पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे की, मृतदेह अंशूचा नाही तर मग कुणाचा होता. त्याचबरोबर ही बाब संपूर्ण गावात चर्चेचा विषय बनली आहे.