तीन मोबाईलमध्ये ५० व्हिडिओ अन्…; भाजप महिला नेत्या सना खान प्रकरणात झाले धक्कादायक खुलासे

नागपूरमधल्या एका भाजप महिला पदाधिकाऱ्याची हत्या झाल्याची बातमी समोर आली होती. सना खान असे तिचे नाव होते. ती जबलपूरला आपल्या पतीला भेटण्यासाठी गेली होती. त्यानंतर ती बेपत्ता झाली होती.

पोलिसांनी शोध घेतल्यानंतर तिची हत्या झाल्याचे समोर आले होते. पोलिसांनी याप्रकरणी तिचा पती अमित साहूला ताब्यात घेतले आहे. अमित हा तिचा बिझनेस पार्टनरही होता. सना खान हत्या प्रकरणी पोलिस तपास करत असून रोज नवनवीन खुलासे होत आहे.

आता आणखी काही खुलासे झाले आहे. तीनपैकी दोन मोबाईलमध्ये ५० पेक्षा जास्त व्हिडिओ असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणात राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि व्यापाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

कमलेशला ताब्यात घेतल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. आतापर्यंत पोलिसांनी याप्रकरणी अमित, कमलेश, अमितचा मित्र राजेश सिंग, नोकर जितेंद्र गौड आणि धर्मेंद्र यादव या पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

२ ऑगस्टला सनाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर अमितने तिच्या पर्समधून काढलेले तीन मोबाईल धर्मेंद्रला दिले होते. त्यांनी त्या मोबाईलची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी कमलेशला दिली होती. पोलिसांनी याप्रकरणी धर्मेंद्रला अटक केल्यानंतर त्याने कमलेशचेही नाव घेतले. त्यानंतर कमलेशची चौकशी केली असता त्याने हे खुलासे केले आहे.

जबरलपूरमधील एका मंदिराजवळ कमलेशने एक मोबाईल लपवून ठेवला होता. तर दोन मोबाईल त्याने नर्मदा नदीतील धरणामध्ये फेकून दिले होते. त्या माहितीवरुन पोलिसांनी मंदिराजवळील एक मोबाईल जप्त केला आहे. तसेच त्या दोन फोनबाबत चौकशी केली असता त्यामध्ये ५० हून अधिक व्हिडिओ असल्याचे कमलेशने सांगितले आहे.

मोबाईल नदीतील धरणात फेकल्याचे सांगितले असले तरी त्याने ते मोबाईल कुठे तरी लपवून ठेवले असतील असा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे त्यांचा पोलिस शोध घेणार आहे. ते मोबाईल सापडले तर याप्रकरणात आणखी खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.