World Cupसाठी पंतप्रधानांच्या शब्दाखातर रद्द केली रिटायरमेंट; खतरनाक क्रिकेटपटूची World Cupमध्ये एंट्री

बांगलादेश क्रिकेट संघाचा वरिष्ठ खेळाडू तमिम इक्बाल ६ जूनपासून चर्चेचा विषय बनला आहे. तमीम इक्बालने 6 जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या 3 वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यातील पराभवानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. या 34 वर्षीय दिग्गज खेळाडूने अचानक घेतलेल्या निवृत्तीच्या निर्णयाने केवळ बांगलादेशच्याच नव्हे तर जगभरातील क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

आता निवृत्तीच्या 24 तासांनंतर हा खेळाडू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तमिम इक्बाल हा बांगलादेशचा खूप मोठा खेळाडू आहे. त्यामुळेच त्याच्या निवृत्तीच्या निर्णयाने सर्वांना, विशेषतः सर्वसामान्यांना आश्चर्यचकित केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी तमीम इक्बाल याच्याशी निवृत्तीच्या निर्णयाबद्दल बोलून त्याला निवृत्ती मागे घेण्याचे आवाहन केले.

पंतप्रधानांच्या विनंतीनंतर तमिम इक्बालने क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संघातील अंतर्गत राजकारणामुळे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणाऱ्या तमीम इक्बालला या वर्षी होणार्‍या आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषक पाहता निवृत्ती मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले होते आणि तमीम इक्बाल हा पंतप्रधानांचे हे अपील फेटाळू शकला नाही.

आता या मोठ्या टूर्नामेंटमधील त्याची भूमिका लक्षात घेऊन निवृत्तीचा विचार सोडून दिला आहे. 34 वर्षीय तमीम इक्बाल बांगलादेशकडून खेळणाऱ्या मोठ्या फलंदाजांपैकी एक आहे. 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या या खेळाडूने आतापर्यंत 70 कसोटी, 241 वनडे आणि 78 टी-20 सामने खेळले आहेत.

कसोटीत 10 शतके आणि 31 अर्धशतकांच्या मदतीने 5134 धावा, एकदिवसीय सामन्यात 14 शतके आणि 56 अर्धशतकांच्या मदतीने 8313 धावा आणि टी-20 मध्ये 1 शतक आणि 7 अर्धशतकांच्या मदतीने 1758 धावा केल्या. तमिम हा बांगलादेशकडून वनडेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.