एका वृद्धाने स्वतः सरण रचून पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी रात्री शेतात जाऊन एका बाजूला स्वतःच सरण रचून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
याबाबत माहिती अशी की, नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील किन्ही गावात आत्माराम मोतीराम ठवकर राहत होते. रात्री त्यांनी गावात मंडई निमित्त सुरू असलेले झाडीपट्टीतील नाटकाचा आनंद घेतला होता. पहाटे पाच वाजता शेताकडे गेले आणि शेतात असलेले लाकडं एकत्र करून सरण रचले, आणि टोकाचा निर्णय घेतला.
त्यांचे पार्थिव अर्धवट जळालेल्या अवस्थेत गावकऱ्यांना मिळाले. यामुळे ही घटना उघडकीस आली. आत्माराम ठवकर यांनी आत्महत्या केलेल्या ठिकाणी पानाचा एक विडा आणि दिवा आढळून आल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.
यामध्ये आत्महत्या आहे की घातपात आहे, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. वेलतुर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मृतक आत्माराम हे वारकरी होते. धार्मिक वृत्तीचे होते. गेल्या काही काळापासून ते आजारी असायचे. यामुळे त्यांनी हा निर्णय का घेतला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत तपासात सविस्तर माहिती समोर येईल.
आत्माराम मोतीराम ठवकर यांचे वय 80 वर्ष होते. त्यांच्या मुलाचा गॅस गोडाऊन असलेल्या शेतात एका बाजूला स्वतःच सरण रचून आत्महत्या केल्याची घटना समोर आल्याचे समजताच पोलिसांनी याठिकाणी धाव घेतली. या घटनेमुळे कुटूंबियांना एकच धक्का बसला आहे.