अजित पवारांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणाला वेगळे वळण लागले आहे. सध्या राज्यात शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची सत्ता आहे. शिवसेना-भाजप यांनी आधी अनेकदा राष्ट्रवादीवर टीका केली होती. पण आता ते त्यांच्यासोबतच सत्तेत आहे.
अजित पवार यांच्या सत्तेत येण्यामुळे अनेक आमदार नाराज आहे. तसेच यावरुन वाद होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. असे असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडाला पाठिंबा देणारे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जवळच्या आमदाराने अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
अजित पवारांवर आरोप करत एकनाथ शिंदे यांनी आणि त्यांच्या आमदारांनी बंड केलं होतं. अजित पवार आम्हाला निधी देत नव्हते, असे एकनाथ शिंदेंचे आमदार म्हणत होते. आता याच मुद्द्यावरुन अपक्ष आमदार आशिष जैस्वाल यांनी अजित पवारांना इशारा दिला आहे.
महाविकास आघाडी सरकार असतानाही अजित पवार उपमुख्यमंत्री होते. पण महाविकास आघाडी सरकार असताना ज्या अजित पवारांनी ज्याप्रकारे निधी पळवला होता, तसला प्रकार आता खपवून घेतला जाणार नाही, असे आशिष जैस्वाल यांनी म्हटले आहे.
कोणत्या एका पक्षाला जास्त निधी दिला आणि दुसऱ्या पक्षाला निधी दिला जात नसेल. तर हा दुसऱ्या पक्षावर अन्याय असतो. पण सरकार हे एका पक्षाचे नाही लक्षात घ्यायला हवे. सरकार सर्व आमदारांच्या पाठिंब्यावर चालत असते. त्यामुळे निधी वाटप करत असताना समतोल राखला पाहिजे, असे जैस्वाल यांनी म्हटले आहे.
तसेच मागच्या सरकारमध्ये किमान समान कार्यक्रम तरी झाला होता. पण आताच्या सरकारमध्ये ते होत नाहीये. आमदारांच्या मतदार संघात ढवळाढवळ केली जाऊ नये. लोकांना फॉर्म्युल्यावर संधी मिळाली पाहिजे. जर निधी पळवला तर इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते, असे जैस्वाल यांनी म्हटले आहे.