अंत्यसंस्कार करा नाहीतर मृतदेह फेकून द्या!! वडिलांच्या मृत्यूनंतर परदेशात नोकरी करणाऱ्या मुलीचे वक्तव्य…

सध्या अनेक मोठ्या हुद्यावर काम करणारी तरुण मुलं आपल्या आईवडिलांना संभाळत नाहीत. त्यांना वृद्धाश्रमात ठेवतात. त्यांच्या अंत्यविधीला जाणं देखील टाळतात, आता असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत एका मुलीने आपल्या वडिलांबद्दल एक धक्कादायक वक्तव्य केले. या मुलीचे वडील वारले नंतर ती म्हणाली, अंत्यसंस्कार करायचे असले तर करा नाहीतर मृतदेह फेकून द्या पण आम्हाला उगीच त्रास देऊ नका, तुम्हाला आम्ही उपचार द्यायला सांगितले नव्हते.

परदेशात शिकणाऱ्या आणि अलिशान आयुष्य जगणाऱ्या पोटच्या मुलीने असे म्हटल्यामुळे याची चर्चा सुरू आहे. पुण्यात काही वर्षे बँक मॅनेजर म्हणून काम केलेल्या मूलचंद शर्मा यांच्या मृत्यूनंतर हा काळीज पिळवटून टाकणारा प्रकार घडला आहे.

मृत मूलचंद शर्मा हे पुण्यात काही वर्षे बँक मॅनेजर म्हणून काम करत होते. त्यांचे दोन्ही मुले आता परदेशात उच्च पदावरील नोकरी करतात. मुलगा दक्षिण आफ्रिकेत तर मुलगी कॅनडात नोकरी करते. मात्र त्यांच्या मोठीपणाचा काहीही उपयोग नाही.

याबाबत माहिती अशी की, शर्मा यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. पण यावेळीही त्यांचे मुले त्यांना भेटण्यासाठी देखील आली नाहीत. त्यांची देखभाल एक कामगार करत होता. त्यांना एका रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

याबाबत ते राहत असलेल्या लॉज मालकाने यासंदर्भातील माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी शर्मांना ताब्यात घेत सरकारी रूग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचा एका आठवड्यापूर्वी मृत्यू झाला. पोलिसांनी ही माहिती मुलांना दिली.

असे असताना मुलीकडून साकारात्मक प्रतिसाद आला नाही. तुम्हाला आम्ही माझ्या वडिलांना उपचार द्यायला सांगितले नव्हते. अंत्यसंस्कार करायचे असले तर करा नाहीतर मृतदेह फेकून द्या पण आम्हाला उगीच त्रास देऊ नका, असे मुलगी म्हणाली. यामुळे त्यांनीच अंत्यसंस्कार केले.