क्रिकेटजगत हादरले! आशिया चषकादरम्यान मॅच फिक्सिंगचा आरोप असलेल्या स्टार खेळाडूला अटक

श्रीलंका संघाचा माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू सचित्र सेनानायकेला मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली 6 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. श्रीलंकेसाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळलेल्या सेनानायकेवर २०२० मध्ये लंका प्रीमियर लीग (एलपीएल) दरम्यान सामना फिक्स करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता.

त्याने दोन खेळाडूंना सामना फिक्स करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. न्यायालयाने सेनानायके यांना तीन आठवड्यांपूर्वी परदेशात जाण्यास बंदी घातली होती. क्रीडा मंत्रालयाच्या विशेष तपास पथकासमोर आत्मसमर्पण केल्यानंतर सचित्र सेनानायकेला अटक करण्यात आली.

सेनानायकेने सामना फिक्स करण्यासाठी दोन खेळाडूंशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधल्याचा आरोप आहे. या खटल्याची सुनावणी कोलंबोच्या मुख्य दंडाधिकारी न्यायालयात सुरू असताना सेनानायके यांना गेल्या महिन्यात देश सोडण्यास बंदी घालण्यात आली होती.

सचित्रा सेनानायके यांनी मॅच फिक्सिंगबाबत आपल्यावर लावण्यात आलेल्या आरोपांबाबत हे पूर्णपणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. सेनानायकेने २०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतर त्याने श्रीलंकेसाठी 49 एकदिवसीय सामन्यांमध्ये 35.35 च्या सरासरीने 53 बळी घेतले.

दुसरीकडे, सेनानायकेने 24 टी-20 सामने खेळताना 25 विकेट घेतल्या आणि त्याला श्रीलंकेकडून 1 कसोटी सामन्यात खेळण्याची संधीही मिळाली. 2014 मध्ये जेव्हा श्रीलंकेने भारताविरुद्ध T20 विश्वचषक फायनल जिंकली तेव्हा सेनानायके देखील त्या संघाचा एक भाग होता.

सेनानायकेने त्या विश्वचषकात 6 सामन्यात केवळ 4 विकेट घेतल्या होत्या. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत, सेनानायकेला संशयास्पद गोलंदाजी कृतीमुळे काही महिन्यांच्या बंदीलाही सामोरे जावे लागले आहे. सेनानायके हा आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघाचा देखील भाग आहे आणि त्याने 8 सामन्यात 9 विकेट घेतल्या आहेत.