जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमधून मोठी बातमी येत आहे. दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला. या चकमकीत लष्कराचे दोन अधिकारी आणि एक पोलीस अधिकारी शहीद झाले आहेत.
लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धोनचक आणि डीएसपी हुमायून भट्ट अशी शहीद जवानांची नावे आहेत. कर्नल मनप्रीत सिंग यांचे वय ४१ वर्षे असून, ते हरियाणातील पंचकुला येथील रहिवासी आहेत.
चकमकीत शहीद झालेले मेजर आशिष धोनचक हे हरियाणातील पानिपतचे रहिवासी आहेत. ज्याचे वय 34 वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. कोकरनाग परिसरातील घनदाट जंगलात दहशतवाद्यांनी केलेल्या जोरदार गोळीबारात शहीद डीएसपीचा मृतदेह सापडला आहे.
एक सैनिक बेपत्ता आहे. या चकमकीत तो गंभीर जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अनंतनागसोबतच राजौरीमध्येही काल रात्रीपासून चकमक सुरू आहे. येथील ऑपरेशन आता संपले आहे.
लष्कराचे 15 कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल राजीव घई, जम्मू आणि काश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंग आणि अनेक अधिकारी ऑपरेशनवर लक्ष ठेवण्यासाठी आणि शहीदांचे पार्थिव परत आणण्यासाठी आणि जखमी जवानांना वाचवण्यासाठी चकमकीच्या ठिकाणी पोहोचले आहेत.
वृत्तानुसार, सुरक्षा दलांना या परिसरात ३-४ दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर तेथे शोधमोहीम राबवण्यात आली. छाप्यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला, त्यानंतर चकमक सुरू झाली.
सूत्रांचे म्हणणे आहे की, दहशतवाद्यांच्या उपस्थितीची विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा संयुक्त शोध मोहीम सुरू केली. जम्मू-काश्मीर पोलिसांचे कमांडिंग ऑफिसर आणि डीएसपी यांच्या नेतृत्वाखाली गोळीबार करण्यात आला.
सुत्रांनी सांगितले की, सुरक्षा दलांना तातडीने या भागात पाठवण्यात आले होते, मात्र दहशतवाद्यांनी केलेल्या जोरदार गोळीबारामुळे जखमींना तातडीने बाहेर काढता आले नाही. या कारवाईत लष्कराच्या एका कुत्र्याचाही मृत्यू झाला आहे.
या चकमकीत शहीद झालेल्या लष्कराच्या कुत्र्याचे नाव केंट असल्याचे लष्करी अधिकाऱ्याने सांगितले. चकमकीदरम्यान त्याने आपल्या हँडलरला वाचवले आणि तो शहीद झाला. केंट हे दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सैनिकांच्या तुकडीचे नेतृत्व करत होता. यादरम्यान त्याला गोळी लागली.
गेल्या २४ तासांत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत सुरक्षा दलांची ही दुसरी चकमक आहे. यापूर्वी राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचा एक जवान शहीद झाला होता. तर ३ जवान जखमी झाले. या चकमकीत सुरक्षा दलांनी 2 दहशतवाद्यांनाही ठार केले. राजौरी येथे सध्या कारवाई सुरू आहे.