शाळेतील विद्यार्थ्यांनी भरलेली बोट नदीत उलटली, १८ मुलं पाण्यात गेली वाहून; ह्रदय पिळवटून टाकणारी घटना

बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. गायघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बागमती येथे नदीत शाळकरी मुलांनी भरलेली बोट उलटली असून, त्यात १८ मुले बेपत्ता झाली आहेत. बोटीत एकूण 34 मुले होती. शाळेत जात असताना हा अपघात झाला.

माहिती मिळताच एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली. घटनेनंतर गोताखोरांच्या मदतीने मुलांना नदीतून बाहेर काढण्यात येत आहे. अनेक मुलांना नदीतून बाहेर काढण्यात यश आले असले तरी 18 विद्यार्थी अद्याप बेपत्ता आहेत.

घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. नदीतील जोरदार प्रवाहामुळे गोताखोरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तरी बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी गोताखोर सतत प्रयत्न करत आहेत. स्थानिक अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

एवढ्या मोठ्या घटनेनंतर लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अनेक वर्षांपासून या नदीवर पूल बांधण्याची मागणी केली जात आहे, मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले. या बोटीत विद्यार्थ्यांसोबत काही महिलाही होत्या, असे सांगण्यात येत आहे. मात्र, याची अद्याप पुष्टी झालेली नाही.

या अपघातानंतर मुजफ्फरपूर प्रशासनात घबराट पसरली आहे. वास्तविक, राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार गुरुवारी, 14 सप्टेंबर रोजी कर्करोग रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी मुझफ्फरपूरमध्ये येत आहेत. मुख्यमंत्री पोहोचण्यापूर्वीच हा अपघात झाला.

राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आणि सांगितले की, “मुझफ्फरपूरचे डीएम या घटनेची चौकशी करत आहेत. या दुर्घटनेत पीडितांच्या कुटुंबीयांना सरकार मदत करेल.” याआधीही दरभंगा जिल्ह्यात बोट बुडून पाच जणांचा मृत्यू झाला होता. कुशेश्वरस्थान परिसरातील कमला नदीत ही घटना घडली आहे.