एक धक्कादायक घटना घडली आहे. लागोपाठ तिसरी मुलगी झाली म्हणून एका बापाने आपल्याच ८ दिवसांच्या मुलीच्या तोंडात तंबाखू कोंबून तिची हत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत. गोकूळ जाधव, (वय. ३०) असे अटक करण्यात आलेल्या नराधम आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. वाकोड येथील हरिनगर तांडा येथे आरोपी गोकुळ जाधव, त्याची पत्नी आणि दोन मुलींसह राहात होता.
त्याची पत्नी तिसऱ्या वेळी गरोदर होती. २ स्पटेंबर रोजी वाकोड प्राथमिक आरोग्य केंद्रात तिची प्रसूती झाली. मात्र तिसऱ्या वेळीही त्यांच्या घरी मुलगी जन्माला आली. यामुळे संतापलेल्या गोकुळने तिचा जीव घेतला. अवघ्या ८ दिवसांच्या लेकीच्या तोंडात त्यानं तंबाखू भरून तिला झोपवले.
त्यातच तिचा मृत्यू झाला. मुलीच्या जन्माची नोंद करण्यासाठी आशा कर्मचारी त्यांच्या घरी गेली असता, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे नंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. यामुळे अधिकची चौकशी केली असता घटना उघड झाली.
डॉक्टर हे वैद्यकीय अधिकारी गावात पोहोचले आणि त्यांनी जाधव यांच्याकडे मुलीबद्दल विचारले. तेव्हा आजारपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचे त्याने डॉक्टरांना सांगितले. मात्र डॉक्टरांना त्याचा संशय आला आणि त्यांनी कसून चौकशी केली, त्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला. यामुळे त्यांना धक्काच बसला.
अवघ्या आठ दिवसांच्या मुलीच्या तोंडात तंबाखू भरून तिला पाळवण्यात झोपवले, त्यातच त्या मुलीचा मृत्यू झाला. रस्त्यावर खड्डा करून रात्रीच्या सुमारास त्यात लेकीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची कबुलीही त्याने दिली.