नाशिकला कुटूंबासह पोळा साजरा केला, जवान देशाची सेवा करायला निघाला अन् अनर्थ घडला, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये असलेल्या खडक माळेगाव येथील भारतीय सैन्य दलातील जवान योगेश सुकदेव शिंदे यांचे अपघाती निधन झाल्याची घटना घडली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेने त्यांच्या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ते सुट्टीवर आले होते. यावेळी ही घटना घडली आहे. गावचा पोळा असल्याने ते घरी आले होते. काही कामानिमित्त आपल्या दुचाकीने वरून वनसगाव रस्त्यावरून जात असताना समोरून येणाऱ्या पिकअप गाडी आणि त्यांच्या मोटारसायकलची जोरदार धडक झाली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

शिंदे यांच्यावर खडक माळेगाव येथे आणल्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्वांच्या डोळ्यात पाणी आले होते. योगेश शिंदे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, भाऊ, भावजई असा परिवार आहे. त्यांच्या या अपघाती निधनाने शिंदे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, अपघातानंतर रात्री त्यांचा मृतदेह पुढील तपासणीसाठी देवळाली कॅम्प येथील आर्मी सेंटर येथे पाठविण्यात आला होता. प्रतिकूल परिस्थितीत जवान योगेश शिंदे यांनी भारतीय सैन्यामध्ये भरती होऊन देशाची सेवा केली.

त्यांनी कुटुंबासोबत पोळ्याचा सण साजरा केला दुसऱ्या दिवशीच ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. सर्वांसोबत त्यांचे चांगले संबंध होते. घरी आल्यानंतर सर्वांशी बोलून मिसळून ते वागत होते.