मित्रांसोबत पार्टीला जाण्यासाठी दिली नाही कार, बदला घेण्यासाठी ड्रायव्हरने केली मालकाची हत्या

एका 72 वर्षीय माजी व्यावसायिकाची त्याच्या ड्रायव्हरने हत्या केल्याचा आरोप आहे. कारण मालकाने त्याला मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी बीएमडब्ल्यू कार देण्यास नकार दिला होता. पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी बागेतून मालकाचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलिसांना घटनास्थळी मृताची कारही सापडली नाही. आरोपी ड्रायव्हरला काही महिन्यांपूर्वीच कामावर घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

पश्चिम बंगालमधील कोलकाता येथून ही बाब समोर येत आहे. बॉसच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी चालक सौरव मंडलला अटक केली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, बुधवारी रात्री उशिरा शहराच्या उत्तर भागातील नागरबाजार येथील त्यांच्या बागेत 72 वर्षीय व्यक्तीचा विकृत मृतदेह आढळून आला.

पाळीव प्राण्यासोबत तो घरात एकटाच राहत होता. हत्येनंतर त्याची कार आणि पाळीव प्राणीही गायब होते. त्यानंतर पोलिसांनी घराची झडती घेतली असता हा पाळीव कुत्रा पोलिसांना स्टोअर रूममध्ये आढळून आला.

पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, “मालकाने काही महिन्यांपूर्वी आरोपीला ड्रायव्हर म्हणून कामावर ठेवले होते. आरोपीला कार त्याच्या वैयक्तिक वापरासाठी घ्यायची होती जेणेकरून तो आपल्या मित्रांना पश्चिम बंगालमधील दिघा या लोकप्रिय बीचवर घेऊन जाऊ शकेल. मात्र , मालकाने कार देण्यास नकार दिला.”

काही दिवसांपूर्वी आरोपीने मालकाला फोन करून कार मागितली. मात्र मालकाने नकार देत कॉल डिस्कनेक्ट केला. याचा राग येऊन आरोपीने एका रात्री भिंतीवरून उडी मारून घरात प्रवेश केला आणि चावी मागायला सुरुवात केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारबाबत दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि त्यातून हाणामारीही झाली. आरोपीने मालकाला धक्काबुक्की केली आणि तो पडल्यावर त्याच्यावर हल्ला केला. त्याच्या डोक्यात वार करून त्याचा गळा आवळून खून केला. नंतर त्याने चाव्या घेतल्या आणि बाहेरून दरवाजा लावून घेतला.”