म्हशींना पाणी पाजण्यासाठी नदीवर गेले, अन् विपरीत घडलं, शेतकऱ्याच्या जाण्याने गाव हळहळलं

जळगावमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. पारोळा तालुक्यातील भिलाली गावाजवळ बोरी नदीच्या पुलावर एक दुःखद घटना घडली आहे. येथे म्हशींना पाणी पाजण्यासाठी जात असताना अचानक बोरी नदीला पूर आला. यात पाय घसरून शेतकरी वाहून गेल्याची घटना घडली आहे.

येथील अमळनेर तालुक्यातील बोले नदीला मोठा पूर आला. त्यामुळे तामसवाडी येथील बोरी नदीवरच्या धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झालेला आहे. यामुळे येथील पाणी पातळीत वाढ झाली आहे.

दरम्यान, पिलाली गावातील कमलाकर पाटील हे त्यांच्या म्हशींना पाणी पाजण्यासाठी घेऊन जात असताना अचानक गावाजवळ बोरी नदीच्या पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी आले. यामुळे कमलाकर पाटील हे खाली पडले.

त्यानंतर पुराच्या पाण्यात वाहून गेले. यावेळी पाण्याचा मोठा वेग होता. यामुळे त्यांना काही करता आले नाही. यातच त्यांचे निधन झाले. ते दुध विक्रीचा व्यवसाय करत होते. त्यांच्या निधनामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते सापडले नाहीत. यासाठी राज्य आपत्ती दलाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाला दुसऱ्या दिवशी सकाळी शोध मोहीम राबवित नदीपात्रात सुमारे दोनशे फुट अंतरावर त्यांचा मृतदेह पहाटे आढळून आला.

एसडीआरएफच्या पथकाने त्यांचे पार्थिव बाहेर काढले. याबाबत पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच कुटूंबियांना एकच धक्का बसला आहे.