पाटणा जिल्ह्यातील खुसरुपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात सावकार आणि त्याच्या साथीदारांनी एका दलित महिलेला विवस्त्र करून, तिला मारहाण करून तिच्या चेहऱ्यावर लघवी केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
एका अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. कर्जाची संपूर्ण रक्कम भरल्यानंतरही सावकाराच्या “अवास्तव” मागणीच्या विरोधात महिलेने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर ही घटना घडली, असे अधिकाऱ्याने सांगितले.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुख्य आरोपी प्रमोद सिंग आणि त्याचा मुलगा अंशू सिंग फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. कर्जाची रक्कम व्याजासह फेडूनही तिला हा छळ सहन करावा लागल्याचा दावा रुग्णालयात दाखल पीडितेने केला आहे.
पीडितेने सांगितले की, “माझ्या पतीने काही महिन्यांपूर्वी प्रमोद सिंग यांच्याकडून 1,500 रुपये उसने घेतले होते आणि आम्ही ते पैसे व्याजासह परत केले, परंतु त्याने (प्रमोद सिंग) आणखी पैशांची मागणी केली. आम्ही ही मागणी मान्य करण्यास नकार दिला.”
ही घटना शनिवारी रात्री पाटणाच्या खुसरुपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली. प्रमोद सिंगने पीडितेला फोनवरून धमकी दिली की, जर तिने त्याला आणखी पैसे दिले नाहीत तर तो तिला गावात नग्न करून फिरायला लावेल. याबाबत पीडितेने मोबाईलवरून पोलिसांकडे तक्रार केली.
पीडितेच्या कुटुंबातील एका सदस्याने पत्रकारांना सांगितले की, “शनिवारी पोलिसांचे एक पथक या तक्रारीची चौकशी करण्यासाठी गावात आले होते, ज्यामुळे प्रमोद आणि त्याचे साथीदार संतप्त झाले. शनिवारी रात्री दहाच्या सुमारास ते तिच्या (पीडित) घरी गेले आणि तिला जबरदस्तीने प्रमोदच्या घरी घेऊन गेले.
तेथे महिलेला विवस्त्र करून मुठीने व काठ्यांनी मारहाण केल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांना दिलेल्या जबाबात महिलेने सांगितले की, “प्रमोदने त्याच्या मुलाला माझ्या चेहऱ्यावर लघवी करण्यास सांगितले. त्याने अगदी तसेच केले. त्यानंतर, मी कशी तरी पळून जाण्यात यशस्वी झाले आणि घरी परतले.”
पाटणाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजीव मिश्रा यांनी सोमवारी पीटीआयला सांगितले की, फरार आरोपींना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.ते म्हणाले, “आम्ही पोलिसांची पाच पथके तयार केली असून आम्ही आरोपींचा शोध घेत आहोत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.