गणपती मिरवणुकीत डान्स करा अन् पैसे कमवा, पुण्यात जाहिरात प्रसिद्ध, तासावर मिळणार पैसे…

गणपती मिरवणूक संदर्भातील एक जाहिरात सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे पुण्यात याची जोरदार चर्चा रंगली आहे. मिरवणूकीत डान्स करण्यासाठी अर्जंट माणसं हवी अशी ही जाहिरात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याबाबत माहिती अशी की, गणपती बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यात नाचण्यासाठी १८ ते ३० वयोगटातील माणसं हवी आहेत, अशी ही जाहिरात आहे. विसर्जन मिरवणूक येत्या २७ सप्टेंबरला असून नाचणाऱ्यांना ३०० रुपये दिले जातील, असे यामध्ये म्हटले आहे.

तसेच इच्छूकांसाठी फोन नंबर देखील देण्यात आला आहे. यामुळे ज्यांना कोणाला मिरवणुकीत नाचायचं आहे आणि पैसेही कमवायचे आहेत. त्यांच्यासाठी ही जाहिरात फायदेशीर ठरणार आहे. यामुळे तुम्ही देखील या नंबरवर संपर्क करू शकता.

दरम्यान, ही जाहिरात नेमकी कुठल्या वर्तमानपत्रात देण्यात आली आहे, याबाबत कुठलीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. या जाहिरातीवर नेटकरी गंमतीशीर प्रतिक्रिया देत आहेत. खाण्या-पिण्याची काही सोय केलीये का नाही? असा प्रश्न काहींनी विचारला आहे.

तसेच नाचून नाचून घशाला कोरड पडली तर सोय केली आहे का? ही नोकरी मिळवण्यासाठी ऑडिशन द्यावं लागेल का? असे गमतीशीर प्रश्न काहींना पडले आहेत. यामुळे याची चर्चा होत आहे.

दरम्यान, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, असे म्हणत भक्तगण ढोल-ताशाच्या तालावर नाचत गात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात. गणपती सध्या आपल्या घरी निघून जाणार आहेत. यामुळे मिरवणुकीची तयारी जोरदार सुरु आहे.