अमरावतीमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. दुचाकीने पाठीमागून धडक दिल्याने महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पहाटे दोन वाजता ड्युटी संपवून घरी परतत असताना हा अपघात झाला.
महिला पोलीस कर्मचारी आठ महिन्यांची गर्भवती होती. याबाबत पोलीस तपास सुरू आहे. पोलिसांनी दुचाकी चालक गौरव मोहोड याला अटक केली आहे. हा आरोपी मद्यधुंद अवस्थेत असल्याची देखील माहिती समोर आली आहे.
याठिकाणी प्रियंका शिरसाट या ग्रामीण पोलिसाच्या नियंत्रण कक्षात काम करत होत्या. सध्या प्रियंका या आठ महिन्यांच्या गर्भवती होत्या. रात्री दोनच्या सुमारास त्या ड्युटी संपवून पती सागर रमेश शिरसाट यांच्यासोबत घरी निघाल्या होत्या. यावेळी हा अपघात झाला आहे.
पाठीमागून वेगाने येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. यातच त्यांचे निधन झाले आहे. यामुळे पोलीस विभागात शोककळा पसरली आहे. या अपघातानंतर पतीने इतर लोकांच्या मदतीने प्रियंका यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले.
असे असताना अतिरक्तस्राव झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर गर्भातील बाळ देखील मरण पावले. त्यांच्या पतीवर सध्या उपचार सुरू आहेत. आरोपी दुचाकीस्वार मद्यधुंद अवस्थेत असल्याने तो देखील अपघातस्थळी पडून होता. नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
याबाबत पोलीस म्हणाले की, प्रियंका शिरसाट या अमरावती ग्रामीण पोलिसांच्या आस्थापनेवर पोलीस अंमलदार म्हणून काम करत होत्या. गेल्या वर्षभरापासून त्या ग्रामीण मुख्यालय नियंत्रण कक्षात कार्यरत होत्या. घरी जाताना अपघातात त्यांचे दुःखद निधन झाले. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.