२० दिवसांपूर्वी पतीचे निधन, आता भयानक अपघातात महिलेसह मुलाचाही मृत्यू; सगळं कुटुंबच संपलं

गडचिरोलीमधून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. याठिकाणी भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील दुचाकीवरील तिघे जागीच ठार झाले आहेत. तसेच एक गंभीर जखमी आहे. मृतांमध्ये आई- मुलासह चुलत सासूचा समावेश आहे. यामुळे अपघातात सगळे कुटूंब उध्वस्त झाले आहे.

सुरजागड येथून लोहखनिज घेऊन ट्रक येत होता. या ट्रकने तहसील कार्यालयासमोर दुचाकीला उडवले. तसेच १० ते १५ फूट फरफटत गेली. रुद्र व भावना यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रियंका यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. तसेच नरेंद्र जनध्यालवार यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे.

हा अपघात खूपच भीषण होता. ट्रकमध्ये अडकलेले मृतदेह काढण्यासाठी जेसीबी बोलवावा लागला होता. स्थानिकांनी सूरजागड लोह खनिज वाहतुकीविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी मोठी गर्दी झाली होती.

यावेळी पो. नि. विजयानंद पाटील यांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह ट्रकखालून काढून रुग्णालयात पाठवले. एकाच कुटुंबातील तिघे गतप्राण झाल्याने मार्कंडा गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

या अपघातात प्रियंका गणेश जनध्यालवार (२४), रुद्र गणेश जनध्यालवार (५) आणि भावना नरेंद्र जनध्यालवार (४५) अशी मृतांची नावे आहेत. नरेंद्र नरेश जनध्यालवार (५२) हे जखमी आहेत. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला हआहे.

दरम्यान, यामध्ये मृत्युमुखी पडलेला चिमुकला रुद्र याचे वडील गणेश जनध्यालवार यांचा २० दिवसांपूर्वीच मृत्यू झाला होता. आता लगेच या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे जनध्यालवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.