दक्षिण-पश्चिम पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात मोठा आत्मघाती स्फोट झाला असून शुक्रवारी झालेल्या या स्फोटात 52 जणांचा मृत्यू झाला असून 50 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे.
बलुचिस्तानमधील मस्तुंग जिल्ह्यातील एका मशिदीजवळ हा स्फोट झाला. प्रेषित मुहम्मद यांचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. एका मिडिया वृत्तानुसार, ईद मिलादुन्नबी उत्सवानिमित्त मिरवणूक काढत असताना हा स्फोट झाला.
पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) मस्तुंग नवाज गशकोरी यांचाही स्फोटात मृत्यू झाला, असे स्थानिक पोलिसांनी डॉनला सांगितले. एका संशयित आत्मघातकी हल्लेखोराने कर्तव्यावर असलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या कारजवळ बॉम्बस्फोट केला.
पाकिस्तानी न्यूज साइट द पाकिस्तानी फ्रंटियरने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मृतदेह आणि कापलेले हातपाय रस्त्याच्या कडेला पडलेले दिसतात. परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
स्फोटाच्या पार्श्वभूमीवर प्रमुख शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. “कराची पोलिसांना शहरातील सुरक्षा उपाय कडक करण्याच्या आणि ईद मिलाद-उन-नबी आणि शुक्रवारच्या नमाजच्या संदर्भात हाय अलर्टवर राहण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत,” उर्दूमधील ट्विटमध्ये म्हटले आहे.
रिपोर्टनुसार, शहीद नवाब गौस बक्श रायसानी मेमोरियल हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी डॉ. सईद मिरवानी यांनी सांगितले की, डझनभराहून अधिक लोकांना त्यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तर २० हून अधिक लोकांची प्रकृती गंभीर आहे म्हणून त्यांना उपचारासाठी क्वेटा शहरात स्थलांतरित केले आहे. ते म्हणाले, मृतदेह आणि जखमींना रुग्णालयात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. 22 हून अधिक जणांना मस्तुंग जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाली आहे.