वाशीममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील मानोरा तालुक्यातील उमरी खुर्द इथे गणपतीच्या प्रसादातून ६० ते ७० लोकांना विषबाधा झाली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे.
यामध्ये ९ वर्षीय पूनम रमेश पवार हिचा यवतमाळ येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच मृतकाची बहीण करिष्मा रमेश पवार व सौ. आकांक्षा अजित पवार यांच्यावर दिग्रस येथील खाजगी रुग्णालयमध्ये उपचार सुरु आहे. ही घटना नेमकी कशामुळे घडली याबाबत सध्या तपास सुरू आहे.
दरम्यान, उमरी खुर्द येथे सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने प्रसाद वाटप करण्यात आला होता. यावेळी अनेकांनी याचा लाभ घेतला होता. दरम्यान, प्रसाद खाल्ल्यानंतर 60 ते 70 जणांना मळमळ, उलटी व हगवण लागल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य पथक गावात दाखल झाले होते.
यामध्ये पाच रुग्णाची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालय मध्ये भरती करण्यात आले. पूनम रमेश पवार हिच्यावसर यवतमाळ येथील वैद्यकीय अधिकारी यांनी शर्थीचे प्रयत्न करून देखील तिचा मृत्यू झाला.
शासकीय रुग्णालयामध्ये शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईक यांना देण्यात आला. या घटनेनंतर सर्वांना धक्का बसला. ही विषबाधा नेमकी कशामुळे झाली याबाबत तपास केला जात आहे. अनेकांवर सध्या लक्ष ठेवून उपचार केले जात आहेत.
गावात एक वैद्यकीय अधिकारी, २ आरोग्य साहायक, आरोग्य सेविका व आरोग्य सेवक यांचे पथक गावात दाखल आहे. त्यांच्याकडून माहिती घेतली जात आहे. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.