Buldhana News : बुलढाणा Buldhana जिल्ह्याच्या मलकापुरातील जाधववाडी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. याठिकाणी उकळत्या दुधाच्या कढईत चिमुकली पडली. कुटुंबीयांनी उपचारही केले, मात्र तिने उपचारांना प्रतिसाद दिला नाही, अखेर तिचा मृत्यू झाला आहे.
ओमश्री युवराज जाधव (वय 6 वर्षे) असे या चिमुकलीचे नाव आहे. ओमश्रीचे वडील युवराज जाधव यांची डेअरी आहे. ते कुटुंबासह नांदुरा रोडवरील जाधववाडी परिसरात राहतात. त्यांच्या घरासमोरील आवारात नेहमीप्रमाणे मोठ्या कढईत दूध उकळण्यासाठी ठेवले होते.
दरम्यान, ओमश्री भावंडासोबत खेळता खेळता अनावधानाने दुधाच्या कढईत पडली. यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. तिला लगेच उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचार झाल्यानंतर तिला जळगाव येथे नेण्यात आले.
नंतर ओमश्रीची प्रकृती गंभीर असल्याने तिला तातडीने मुंबईत नेण्यात आले. तिथे तिच्यावर एकापाठोपाठ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. अखेर तीन आठवडे उपचार करुनही तिच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नाही.
अखेर 21 दिवसांनी तिचा संघर्ष संपला आणि सकाळी तिचं निधन झाले आहे. या घटनेमुळे मलकापूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना 21 दिवसांपूर्वी घडली होती. मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयश ठरली आणि तिने अखेरचा श्वास घेतला.