Panjab : एका मिनीटात संपलं अख्खच्या अख्ख कुटुंब, घरातील फ्रीजच्या भीषण स्फोटात ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

Panjab : पंजाबमधील जालंधरमध्ये रविवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली, ज्यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे. अक्षय, यशपाल घई, मंशा, दिया आणि रुची अशी मृतांची नावे आहेत.

यशपालचा मुलगा गंभीर जखमी असून त्याच्यावर डीएमसी, लुधियाना येथे उपचार सुरू आहेत. जालंधरच्या अवतार नगर येथील गल्ली क्रमांक १२ मध्ये ही घटना घडली. मृत यशपाल घई यांचा भाऊ राज घई सांगतात की, त्यांच्या भावाने सात महिन्यांपूर्वी डबल डोअर फ्रिज विकत घेतला होता.

रात्री उशिरा कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन घराला आग लागली. कोणालाही घराबाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे 65 वर्षीय यशपाल घई, त्यांचा मुलगा, सून यांच्यासह दोन मुलींचा जळून मृत्यू झाला. त्याची वृद्ध वहिनी घराबाहेर असताना तिला सुखरूप वाचवण्यात यश आले.

रेफ्रिजरेटरच्या कॉम्प्रेसरमध्ये झालेल्या स्फोटामुळे गॅस घरात तसेच रस्त्यावर पसरला. त्यामुळे अग्निशमन दलाचे कर्मचारी रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात व्यस्त होते. अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी घरातील लोकांना बाहेर काढले.

त्यानंतर त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी तीन जणांना मृत घोषित केले तर दोघांना खाजगी रुग्णालयात रेफर करण्यात आले. दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी कुटुंबातील सदस्य क्रिकेट सामना पाहत होते, असे सांगण्यात येत आहे.

यादरम्यान जोरात स्फोट होऊन आग पसरली. कंप्रेसरमध्ये गॅसचा स्फोट झाल्याने घरातील लोक बेशुद्ध होऊन आगीने वेढले गेले. आम आदमी पक्षाचे जालंधरचे खासदार सुशील रिंकू यांनी कुटुंबातील वाचलेल्या वृद्ध महिलेची भेट घेऊन शोक व्यक्त केला. त्यांनी कुटुंबाला मदतीचे आश्वासन दिले.