Tuljapur news : काल लेकाचे लग्न अन् आज वडिलांसह विवाहित बहिणीची अंत्ययात्रा, लग्नानंतर घडलं भयंकर

Tuljapur news : बिदर जिल्ह्यातील भालकी तालुक्यातील लंजवड येथील चव्हाण कुटुंबासोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. याठिकाणी विवाहानंतर तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येत असताना नवदाम्पत्याच्या जीपचे अचानक टायर फुटले, यामुळे मोठा अपघात झाला.

यामुळे भरधाव जीप पलटी झाली. या भीषण अपघातात मामा-भाची असे दोघेजण जागीच ठार झाले, तर अन्य चौदाजण जखमी आहेत. ही घटना तुळजापूर- औसा महामार्गावरील करजखेडा शिवारात घडली. यामुळे मोठी खळबळ उडाली.

संपूर्ण कुटुंब तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी जीपमधून औसा मार्गे तुळजापूरकडे येत होते. ही जीप धाराशिव तालुक्यातील करजखेडा शिवारात आली होती. तेव्हा अचानक टायर फुटले असता, भरधाव जीप पलटी झाली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला.

दरम्यान, अपघातानंतर दोघा मृतांसह जखमींना तातडीने स्थानिकांच्या मदतीने तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी काहींवर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी लातूर येथे नेण्यात आले. सध्या जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

दोन दिवसांपूर्वीच घरात विवाह झाला होता. नवदाम्पत्यासोबत चव्हाण कुटुंबीय नातेवाइकांसह तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येत होते. त्यांच्या जीपला अपघात झाला असता दोघे जागीच ठार झाले, यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.