Raireshwar : किल्ले रायरेश्वर पठारावर जाण्यासाठी मोठी कसरत शिवप्रेमींना करावी लागते. याठिकाणी शिडी लावण्यात आली असली तरी ती खूप मोठी आहे. यामुळे भीती वाटते. शिडी तीव्र उताराची असल्याने शिडीवरुन गडावर जाताना आणि येताना भीती वाटत असते.
असे असताना रायरेश्वर येथील जंगम या शेतकरी बंधूंनी शेती कामासाठी ट्रॅक्टर खरेदी केला. तो ट्रॅक्टर चक्क ४ हजार ६९४ फूट उंच किल्ल्यावर नेण्यात आला आहे. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हे नेमकं कस केलं याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
हा ट्रॅक्टर वर घेऊन जाण्यासाठी त्यांनी अनोखा जुगाड केला आहे. यामध्ये मेकॅनिककडून ट्रॅक्टरचे टायर, इंजिन, मडगार्ड, साठा असे पार्ट ट्रॅक्टरपासून वेगळे केले. हे पार्ट २० ते २५ ग्रामस्थांच्या मदतीने शिडीवरुन लाकडाच्या मेंढी लावून, रस्सीने बांधून डोली करत नेण्यात आले.
तसेच ट्रॅकरचा मेन सांगाडा, मागचे टायर आणि इंजिन लाकडाच्या मेंढी लावून डोली करत कडेकपाऱ्यातून अतिशय कठीण परिस्थितीत शिडीवरुन पठाराच्या सपाटावर नेण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
दोन दिवस हे काम सुरू होते. नंतर वरती ट्रॅक्टरचे वेगळे पार्ट जोडण्यात आले. त्यानंतर ट्रॅक्टर चालू करण्यात आला. यामुळे परिसरातल्या शेतकऱ्यांच्या शेतीसाठी रायरेश्वर किल्ल्यावर ट्रॅक्टर नेण्याचे स्वप्न साकार झाले.
रायरेश्वरावर पहिल्यांदाच शेतीसाठी ट्रॅक्टर नेण्यात आला आहे. याचे समाधान शेतकऱ्यांमध्ये होते. पठारावर ३०० लोकसंख्या असून, ४५ कुटुंबे राहतात. हे ठिकाण भोरपासून २६ कि. मी. अंतरावर आहे. परिवहन मंडळाची बस कोर्ले गावापर्यंत जाते. मात्र पुढे मोठी पायपीट करावी लागते.