Gujarat : मुलीने गरब्यात जिंकली २ बक्षीसं, मिळालं एकच, आईने जाब विचारताच आयोजकांनी वडीलांना संपवलं

Gujarat : गुजरातमधील पोरबंदरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील गरबा महोत्सवात एका 11 वर्षीय मुलीने दोन स्पर्धा जिंकल्या होत्या पण तिला फक्त एकच पुरस्कार देण्यात आला होता, याला विरोध केल्यावर मुलीच्या वडिलांचा आणि गरबा आयोजकांशी वाद झाला.

त्यानंतर कार्यक्रमाच्या आयोजकांनी मुलीच्या वडिलांना मारहाण केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी बुधवारी या घटनेची माहिती दिली. पोलीस उपअधीक्षक रुतु राबा यांनी सांगितले की, पीडित सरमन ओडेद्रा यांच्यावर मंगळवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास पोरबंदरमधील कृष्णा पार्क सोसायटीजवळ सात जणांनी लाठ्या व इतर वस्तूंनी हल्ला केला.

राबा म्हणाले, ओडेदराच्या हत्येतील सर्व ७ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आरोपींमध्ये राजा कुचडिया, राजू केशवाला, रामदे बोखिरिया, प्रतीक गोरानिया आणि त्यांच्या तीन साथीदारांचा समावेश आहे.

एफआयआर नुसार, या आरोपींनी ओडेदरा कुटुंब राहत असलेल्या कृष्णा पार्कला लागून असलेल्या शाळेजवळ नवरात्रीनिमित्त पारंपारिक नृत्य गरब्याशी संबंधित कार्यक्रम आयोजित केला होता.

पोरबंदर येथील उद्योगनगर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत ओडेदाराची पत्नी मालीबेन यांनी सांगितले की, सोमवारी रात्री ती खेळण्यासाठी गेली तेव्हा त्यांची ११ वर्षांची मुलगी गरबा खेळून घरी आली आणि तिने दोन वेगवेगळ्या स्पर्धा जिंकल्याचे सांगितले, पण आयोजकांनी तिला फक्त एकच पुरस्कार दिला.

एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, जेव्हा मालीबेन आपल्या मुलीची तक्रार घेऊन आयोजकांकडे गेली तेव्हा केशवाला यांनी स्पष्टपणे तिला निर्णय स्वीकारण्यास सांगितले आणि पुरस्कार घ्या किंवा सोडण्यास सांगितले.

काही वेळातच कुचडिया आणि बोखिरियाही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मालिबेनशी वाद घालण्यास सुरुवात केली. घटनास्थळावरून न हलल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली.

एफआयआरनुसार, कुचडिया आणि केशवाला यांच्या पत्नींनीही मालिबेनला शाब्दिक शिवीगाळ केली आणि तिला तेथून निघून जाण्यास सांगितले. यानंतर मालीबेन आणि त्यांची मुलगी पहाटे एकच्या सुमारास घरी परतल्या.

एफआयआरनुसार, तासाभरानंतर मालीबेन आणि त्यांचे पती त्यांच्या घराबाहेर बसले असताना चार मुख्य आरोपी आणि त्यांचे तीन साथीदार मोटारसायकलवरून तेथे आले आणि त्यांनी ओडेदाराला लाठ्या-काठ्या आणि लाकडी फळ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

पतीला वाचवताना मालीबेन यांनाही दुखापत झाली. यानंतर आरोपींनी ओडेदरा यांना त्यांच्या दुचाकीवरून गरबा स्थळी नेले आणि पोलिस येईपर्यंत त्यांना मारहाण केली. याची माहिती ओडेदरा यांच्या मुलीने पोलिसांना दिली.

एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की पोलिसांनी ओडेदाराला त्यांच्या वाहनातून रुग्णालयात नेले, परंतु त्यांना वाचवता आले नाही.