Gujarat : गुजरातमधील सूरतमध्ये एक मोठी घटना घडली आहे. येथे एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
आर्थिक विवंचनेमुळे कुटुंबीयांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणाची माहिती देताना झोन 5 चे डीसीपी राकेश बारोट म्हणाले की, ही घटना अडाजन परिसरातील सिद्धेश्वर अपार्टमेंटमध्ये घडली.
अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर कनुभाई सोळंकी हे कुटुंबासह राहत होते. कनुभाई यांचा मुलगा मनीष उर्फ शांतू सोळंकी पंख्याला लटकलेला होता, तर कनुभाई, त्यांची पत्नी शोभनाबेन, मनीषची पत्नी रिटा, मनीषच्या १० आणि १३ वर्षांच्या मुली दिशा आणि काव्या तसेच लहान मुलगा कुशल यांचे मृतदेह बेडवर पडलेले आढळून आले.
डीसीपी पुढे म्हणाले, “पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मनीष सोलंकी इंटेरिअर डिझाइन आणि फर्निचरचा व्यवसाय करत होता. घरातून सुसाईड नोट आणि रिकामी बाटलीही सापडली आहे. ज्यात बहुधा विष असावे.
कारण उर्वरित सदस्यांचा मृत्यू विषामुळे झाला. मनीषच्या घरातून सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये कुटुंबाकडून उधार दिलेले पैसे परत न मिळाल्याने आर्थिक विवंचनेमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे नमूद केले आहे.
या घटनेबाबत सुरतचे महापौर निरंजन जंजमेरा म्हणाले, “मनीष सोलंकीने गळफास घेण्यापूर्वी त्याच्या कुटुंबीयांना विष प्राशन केल्याचे दिसते. सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.”
या वर्षी जुलै महिन्यात मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका तरुणाने पत्नी आणि मुलांसह आत्महत्या केली होती. या तरुणाने यापूर्वी आपल्या लहान मुलांना विष देऊन ठार केले होते. यानंतर पत्नीसोबत फाशी घेतली होती. या घटनेमागे अॅपद्वारे कर्ज घेतल्याचे कारण समोर आले आहे.
घरच्या प्रमुखाने या समस्येतून बाहेर पडण्यासाठी खूप प्रयत्न केले होते, पण कोणताही मार्ग दिसत नसताना त्यांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला होता. मृत्यूपूर्वी या कुटुंबाने 4 पानी सुसाईड नोट सोडली होती. ही घटना 12 जुलै रोजी रात्री भोपाळच्या रतीबाद येथे घडली. येथे भूपेंद्र विश्वकर्मा कुटुंबाची सामूहिक आत्महत्या झाली.