अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या बंडखोर आमदारांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. ते शरद पवारांची भेट घेण्यासाठी वाय बी चव्हाण सेंटरला गेले होते. या आमदारांच्या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांनी शरद पवारांची भेट का घेतली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता या भेटीवर अजित पवार गटातील नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांच्या गटातील नेते शरद पवारांना का भेटायला गेले होते? याचे कारण प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले आहे.
अजित पवार आणि त्यांची नेत्यांची शरद पवारांची झालेली भेट ही पुर्वनियोजित नव्हती. ते अचानक शरद पवारांच्या भेटीला गेले होते. जवळपास तासभर शरद पवारांशी चर्चा झाली. पण शरद पवारांनी आमच्याशी भाष्य केलं नसल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.
आमचे सर्वांचे दैवत, आमचे नेते, आदरणीय शरद पवारसाहेब यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. आम्ही त्यांना वेळ मागितला नव्हता. आम्ही पुर्वकल्पना न देताच इथे आलो होतो. शरद पवार हे मिटिंगनिमित्त चव्हाण सेंटरमध्ये आहे हे कळल्यानंतर आम्ही संधी साधून इथे आलो, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.
शरद पवारांना भेटताच आम्ही पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. तसेच आम्ही साहेबांना विनंती केली की आमच्या मनात त्यांच्यासाठी खुप आदर आहे. राष्ट्रवादी एकसंघ कसा राहू शकतो यासाठी योग्य विचार करुनन मार्ग काढावा. आम्ही त्यांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली आहे, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.
शरद पवारांनी आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आहे. यावेळी सर्व मंत्री शरद पवारांच्या भेटीला हजर होते. सर्वांनी शरद पवारांना यातून मार्ग काढण्याची विनंती केली आहे. पण शरद पवारांनी यावर काहीही भाष्य केलं नाही, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.