राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडलेले आहे. त्यामध्ये अजित पवारांचा गट हा सत्तेत आहे तर शरद पवारांचा गट हा विरोधात आहे. त्यामुळे आता सभागृहात नक्की व्हीप कोणाचा मानायचा? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
अजित पवारांच्या बंडखोरी आधी राष्ट्रवादीचे अनिल पाटील हे विधानसभेतील प्रतोद होते. पण आता अनिल पाटील हे अजित पवारांसोबत जाऊन सत्तेत सामील झाले आहे. त्यामुळे अजित पवारांनी त्यांनाच प्रतोदपदी कायम ठेवलं आहे.
अशात शरद पवार यांच्या गटाने मात्र नवीन प्रतोदाची निवड केली आहे. त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रतोदपदी निवड केली आहे. तसेच पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटाकडून व्हीप जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आमदारांसमोर अडचण निर्माण झाली आहे.
आता आमदारांना अजित पवारांचं ऐकायचं की शरद पवारांचं ऐकायचं? असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे आमदार काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. असे असताना महत्वाची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या गटाचा व्हीप मानायचा याबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर घेणार आहे. असे असले तरी आता शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीतही दोन प्रतोद दिसणार असून दोन्ही गटाचे प्रतोद व्हीप बजावणार असल्याचे समोर आले आहे.
राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर खरा पक्ष कोणता याबाबत अजूनही उत्तर मिळालेले नाहीये. त्यामुळे विधानसभेच्या अध्यक्षांचा निर्णय होईपर्यंत दोन्ही गटाचे व्हीप अस्तित्वात राहणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचा पाठिंबा नक्की कोणत्या गटाला हे तपासल्यानंतर विधानसभा अध्यक्ष याबाबत निर्णय घेणार आहे. प्रदीर्घ काळासाठी ही सुनावणी चालू राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.