Sikandar Shaikh : सिकंदर शेखने यंदाची महाराष्ट्र केसरी गदा जिंकली आहे. महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात त्याने शिवराज राक्षेला हरवले. यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा नेताजी सुभाषचंद्र बोस स्कूल, लोणीकंद – फुलगाव, पुणे येथील मैदानावर पार पडली.
कुस्तीपटू सिकंदर शेख यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. त्याने महाराष्ट्र केसरी 2023 च्या अंतिम फेरीत शिवराज राक्षेचा पराभव केला. सिकंदरने अनेक युक्त्या करून शिवराजला पराभूत करत 66 वा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळविला.
सिकंदर शेख याने अवघ्या दहा सेकंदात शिवराज राक्षे याला चितपट करत महाराष्ट्र केसरीची गदा आणि महिंद्रा थार गाडी पटकवली. यावेळी बोलताना सिकंदर शेखने गतवर्षीचा खरा विजेता मीच होतो असे सांगतीले.
विजयाचे खरं श्रेय माझे वडील आणि कोच यांना जातं असं सांगत,मागील वर्षी वाद खोटा उठवला होता आणि मागच्या वर्षी देखील खरा विजेता मीच होतो सांगत माझं पुढच ध्येय हे खुप मोठं आहे असं महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याने सांगितले.
यंदा शिवराजला सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होण्याची संधी होती. पण सिकंदरने हे होऊ दिले नाही. दरम्यान, गेल्या वर्षी सिकंदर शेख उपांत्य फेरीत पराभूत झाला होता. पण नंतर तो सोशल मीडियावर हिरो बनला.
गेल्या वर्षीच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सिकंदरला अन्यायकारक वागणूक मिळाल्याचे अनेक चाहते आणि कुस्ती तज्ञांचे मत होते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सिकंदरच्या बाजूने भावनिक लाट निर्माण झाली.
गतवर्षी सिकंदरला उपांत्य फेरीत महेंद्र गायकवाडकडून पराभव पत्करावा लागला होता. यानंतर महेंद्र गायकवाडला अंतिम फेरीत शिवराज राक्षेकडून पराभव पत्करावा लागला. गेल्या वर्षी महाराष्ट्र केसरी 2022 चा माती गटातील सेमीफायनल महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख यांच्यात झाली होती. यात महेंद्र विजयी झाला.
महेंद्रने बाहेरच्या टांगेच्या डावाने सिकंदरचा पराभव केला होता. या डावाची त्यावेळी खूप चर्चा झाली होती. महेंद्र गायकवाडचा बाहेरचा पाय यामुळे तो डाव आक्षेपार्ह होता. तसेच सिकंदर शेखला त्यावेळी डेंजर झोनमध्ये नव्हता, मग महेंद्रला 4 गुण का देण्यात आले? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले.
कोण आहे सिकंदर शेख? सिकंदर हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील असून त्याच्या घराण्याला कुस्तीचा वारसा लाभला आहे. सिकंदरचा महाराष्ट्र केसरी स्पर्धेपर्यंतचा प्रवास खूपच खडतर होता.
त्याचे वडीलही कुस्ती खेळायचे. मात्र गरिबीमुळे त्यांना हमाल म्हणून काम करावे लागले. सिकंदर नुकताच भारतीय लष्करात दाखल झाला आहे. तो लष्करासाठीही खेळतो. आपला मुलगा मोठा मल्ल व्हावा ही वडिलांची इच्छा त्यांनी पूर्ण केली आहे.
आत्तापर्यंत सिकंदरने देशभरात कुस्ती खेळून अनेक पारितोषिके जिंकली आहेत. सिकंदरने एक महिंद्रा थार चारचाकी, एक जॉन डीअर ट्रॅक्टर, 4 अल्टो कार, 24 बुलेट, 6 TVS, 6 स्प्लेंडर्स आणि 40 चांदीच्या गदा जिंकल्या आहेत