राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडलेले आहे. एक गट अजित पवारांचा आहे तर दुसरा गट शरद पवारांचा आहे. अजित पवारांनी आपल्याकडे ४० आमदार असल्याचा दावा केला होता. तर शरद पवार यांच्या गटातील नेते जयंत पाटील यांनी आपल्याकडे १९ आमदार असल्याचा दावा केला होता.
विधीमंडळातील पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. यावेळी शरद पवार यांच्या गटातील आमदार हे विरोधी पक्षाच्या बाकावर बसताना दिसून आले. यावेळी त्यांच्या आमदारांची संख्या पाहता जयंत पाटलांनी केलेला दावा खोटा ठरल्याचे दिसून येते.
विधीमंडळात शरद पवार आणि अजित पवार यांच्या आमदारांची बसण्याची व्यवस्था वेगवेगळी करण्यात आली होती. अजित पवारांच्या गटाला बसण्यासाठी जास्त जागा देण्यात आली होती. कारण त्यांच्या आमदारांची संख्याही जास्त आहे. पण शरद पवार यांच्या गटाच्या जागेवर फक्त आठच आमदार बसताना दिसून आले.
शरद पवार यांच्या गटातील आमदारांच्या जागेवर फक्त आठच आमदार बसलेले दिसून आल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. जयंत पाटील,अनिल देशमुख, बाळासाहेब पाटील, प्राजक्त तनपुरे, राजेश टोपे, सुमन पाटील, सुनील भुसारा आणि रोहित पवार हे आठ आमदार तिथे बसलेले होते.
त्यामुळे आता शरद पवारांकडे फक्त आठच आमदार आहेत का? अशी चर्चा राज्याच्या राजकारणात होत आहे. तसेच जितेंद्र आव्हाड सभागृहात नव्हते. तेही शरद पवारांच्या गटात आहे. ते मिळून शरद पवारांच्या गटाकडे ९ आमदार होतात. त्यामुळे बाकीचे १० आमदार कुठे आहेत? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
राष्ट्रावादीच्या आमदारांची एकूण संख्या ही ५४ आहे. त्यापैकी ४० आमदार हे अजित पवार यांच्याकडे आहे, असे म्हटले जात आहे. तर ९ आमदार शरद पवार यांच्याकडे आहे. तर आणखी ५ आमदार नक्की कुठे आहेत? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.