World Cup 2023 : वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेत सलग 10 सामन्यांमध्ये दमदार विजय मिळवल्यानंतर अंतिम सामन्यामध्ये भारताने कच खाल्ली आणि वर्ल्ड कपने पुन्हा रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने हुलकावणी दिली.
सेमी फायलनमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यामध्ये 397 धावांचा डोंगर उभारणाऱ्या रोहित शर्माच्या संघाकडून फायलनमध्ये मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती. भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत केलेल्या कामगिरीच्या अगदी उलट कामगिरी फायलनमध्ये केली.
भारतीय संघाला पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध केवळ 240 धावांपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियन संघाने हे माफक आव्हान 6 गडी बाकी असतानाच जिंकलं आणि वर्ल्ड कपवर सहाव्यांदा नाव कोरलं.
भारताचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मा नेहमीप्रमाणे मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवूडसारख्या जागतिक स्तरावरील वेगवान गोलंदाजांच्या गोलंदाजीची पिसं काढत होता. त्यामुळेच पॅट कमिन्सने 10 ओव्हरच्या आतच ग्लेन मॅक्सवेलसारख्या फिरकीपटूकडून गोलंदाजी करुन घेतली.
पॅट कमिन्सने खेळलेला हा डाव ऑस्ट्रेलियाला फायद्याचा ठरला. मॅक्सेवेलला मोठा फटका मारण्याच्या नादात रोहित शर्मा 31 बॉलमध्ये 47 धावा करुन बाद झाला. गावसकर यांच्या दाव्यानुसार रोहित शर्मा बाद झाला तोच सामन्याचा टर्निंग पॉइण्ट ठरला.
ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडने मागे पळत जात रोहितचा अप्रतिम झेल घेतला. “रोहित शर्माचा कॅच हाच सामन्याचा टर्निंग पॉइण्ट ठरला. रोहित शर्मा उत्तम फलंदाजी करत होता. तो अशाच पद्धतीने खेळतो. माझ्यामते त्या ओव्हरला एक सिक्स आणि एका फोरने आधीच 10 धावा झाल्या होता.
त्यावेळेस त्याने तो फटका मारायला नको हवा होता. मला ठाऊक आहे की तो फटका योग्य पद्धतीने बसला असता तर तो सिक्स गेला असता. तेव्हा आपण सर्वांनी उठून टाळ्या वाजवत त्याचं कौतुक केलं असतं. मात्र कायम पाचवा गोलंदाज असा असतो की ज्याला आपण लक्ष्य करु शकतो. सामन्यामध्ये त्या क्षणी घाई करण्याची गरज नव्हती,”
असं गावसकर यांनी ‘स्टार स्पोर्ट्स’ला दिलेल्या मुलाखतीत रोहितची चूक दाखवून देताना म्हटलं. मात्र आता याच कॅचवरुन वाद सुरु झाला असून हा कॅच ट्रेव्हिस हेडच्या हातातून सुटला होता. कॅच पकडताना ट्रेव्हिस हेडच्या हातातला बॉल जमीनीला टेकला होता असा दावा केला जात आहे.
त्यासंदर्भातील फोटोही व्हायरल झाले आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर या पोस्ट केल्या आहेत. त्यामुळे खरोखरच रोहित नाबाद होता का असा प्रश्न निर्माण होत आहे. मात्र या फोटो आणि दाव्यामागील सत्य समोर आलं असून रोहित खरोखरच नाबाद होता का या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
आयसीसीच्या अधिकृत इन्स्टाग्राम हॅण्डलवरुन ट्रेव्हिस हेडने पकडलेल्या या अफलातून कॅचचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये ट्रेव्हिस हेडने कॅच पकडल्यानंतर कोणत्याही पद्धतीने बॉल जमिनीला टेकू दिला नव्हता. असं असलं तरीही ट्रेव्हिस हेडने कॅच सोडल्याचा दावा करणारा खोटा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
तरी रॉयटर्ससारख्या अधिकृत वृत्तसंस्थेने पुरवलेले फोटो पाहिले तरी ट्रेव्हिस हेडने झेल सोडला नव्हता असं दिसून येतं. त्यामुळेच रोहित वर्ल्ड कप फायलनमध्ये नाबाद होता हा दावा चुकीचा ठरतो. हा दावा पूर्णपणे खोटा असून रोहित शर्माचा अचूक झेल ट्रेव्हिस हेडने पकडला होता.