Dhule News : तरुणीची घरात हत्या, दुसऱ्या दिवशी घराजवळ तरुण मृतावस्थेत, धुळ्यात घडली भयंकर घटना..

Dhule News : धुळे शहरात एका तरुणीची हत्या करण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. असे असताना त्यानंतर दुसऱ्या दिवशी आणखी एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. निकिता कल्याण पाटील असं हत्या झालेल्या २१ वर्षीय तरुणीचे नाव आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस श्वानपथकासह घटनास्थळी दाखल झाले होते. बालाजी नगर भागातील विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या पाठीमागे पाटील कुटुंबीय राहते. घरी कोणी नसल्याचे पाहून आरोपीने थेट घरात घुसून तरुणीची गळा चिरून हत्या केली होती.

याबाबत पोलीस तपास करत असताना निकिता पाटीलच्या घराच्या काही अंतरावरच काटेरी झुडपांमध्ये एका तरुणाचा देखील मृतदेह आढळून आला आहे. यामुळे पोलिसांनी याचे धागेदोरे लागतात का? याबाबत तपास सुरू केला. तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली.

या तरुणाचे नाव अनिकेत बोरसे आहे. हा तरुण निकिता पाटीलशी संबंधित असल्याचे देखील सांगितले जात आहे. तरुणी निकिता पाटील आणि अनिकेत बोरसे यांच्यामध्ये प्रेम संबंध होते आणि त्यातूनच निकिता पाटील हिचा खून आणि मग अनिकेत बोरसे याची आत्महत्या झाली असावी, असे म्हटले जात आहे.

दरम्यान, या तरुणाने निकिता पाटील या तरुणीचा खून केला असावा असा अंदाज पोलिस व्यक्त करत आहेत. जोपर्यंत सखोल तपास करून सदर घटनेचा तपास लागत नाही, तोपर्यंत अधिक तपास सुरू असणार असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांनी दिली.

या घटनेमुळे मात्र धुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास सुरू असून पोलिसांना महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. यामुळे तपासाला वेग आला आहे.