Gujarat : गुजरातमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने कहर केला आहे. रविवारी गुजरातच्या विविध भागांमध्ये वादळ आणि गारपिटीमुळे 14 जणांचा मृत्यू झाला. या वादळी पावसामुळे 40 गुरेही दगावली आहेत.
स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर (SEOC) नुसार, दाहोद जिल्ह्यात तीन, भरूचमध्ये दोन आणि अमरेली, सुरेंद्रनगर, मेहसाणा, बोताड, पंचमहाल, खेडा, साबरकांठा, सुरत आणि अहमदाबादमध्ये प्रत्येकी एक एक मृत्यू झाला
स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन्स सेंटर (SEOC) मधील एका अधिकाऱ्याने सांगितले की, सर्व मृत्यू हे जोरदार वादळामुळे झाले आहेत. इतर क्षेत्रांमधून डेटा आणि माहिती येणे बाकी आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या २४ तासांत गुजरातच्या विविध भागात अवकाळी पाऊस आणि जोरदार गारपीट झाली. त्यामुळे राज्यात थंडी वाढली आहे. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, 27 नोव्हेंबर रोजी गुजरातमध्ये पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.
155 हून अधिक तहसील अवकाळी पावसाने प्रभावित झाले आहेत. सौराष्ट्र भागात हवामानाची स्थिती गंभीर होती. राज्यभरातील इतर जिल्ह्यांमध्येही पाऊस आणि सोसाट्याचा वारा होता. सुरत, अहमदाबाद आणि गांधीनगरसह शहरांमध्ये मुसळधार पाऊस झाला.
यासोबतच धुक्यामुळे कमी दृश्यमानतेमुळे वाहतुकीशी संबंधित आव्हाने वाढली आहेत. गीर सोमनाथ जिल्ह्यातील तलाला येथे रविवारी दुपारपर्यंत सर्वाधिक ४६ मिमी पावसाची नोंद झाली.
सौराष्ट्रातील जुनागडमधील वंथली येथे 43 मिमी, सुरेंद्रनगरमधील दसडा येथे 36 मिमी, गीर सोमनाथमधील पाटण-वेरावळमध्ये 35 मिमी आणि जुनागडमधील केशोदमध्ये 29 मिमी पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे सोशल मीडियावरही खळबळ उडाली.
लोकांनी X वर गारपिटीचे व्हिडिओ आणि फोटो शेअर केले. हवामान खात्याने दक्षिण गुजरात किनारपट्टीवरील मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. मच्छिमारांना ताशी 60 किमी वेगाने वारे वाहत पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे.