Bee : मधमाशी गिळल्यानं मजुराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये घडली आहे. पाणी पित असताना मजुरानं चुकून मधमाशी गिळली. त्यानंतर त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आला. पण तिथे त्यानं अखेरचा श्वास घेतला.
भोपाळच्या बेरसिया परिसरात एका मजुरानं पाणी पिताना चुकून मधमाशी गिळली. मधमाशीनं त्याच्या अन्ननलिकेला डंख मारला. त्यामुळे त्याच्या श्वसननलिकेला सूज आली. त्यामुळे मजुराला श्वास घेण्यास अडचण येऊ लागली.
श्वासोच्छवासात त्रास होऊ लागल्यानं मजुराला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याला उलटी करण्यास सांगण्यात आलं. यानंतर मधमाशी बाहेर काढण्यात आली. मात्र काही वेळानं मजुराचा मृत्यू झाला.
पोलीस निरीक्षक नरेंद्र कुलस्ते यांनी घडलेल्या घटनेबद्दल अधिक माहिती दिली. ‘जिल्हा मुख्यालयापासून ४० किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. बेरसिया परिसरात राहणारा मजूर हिरेंद्र सिंह त्याच्या घरी ग्लासातून पाणी पित असताना त्यानं चुकून मधमाशी गिळली.
त्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागलं. श्वास घेताना त्रास होऊ लागला. त्याच्या अन्ननलिकेला सूज आली होती,’ असं कुलस्ते यांनी सांगितलं. मजुराच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यानं त्याला खासगी रुग्णालयात नेण्यात आलं.
गुरुवारी रात्री एकच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. उपचार सुरू असताना हिरेंद्र सिंहनं उलटी करुन मधमाशी बाहेर काढली. पण त्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकली नाही. त्याची प्राणज्योत मालवली.